शिक्षण व संशोधनाची गुणवत्ता वाढविणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 11:48 PM2017-10-09T23:48:49+5:302017-10-09T23:49:03+5:30
तंत्रज्ञानाने उच्च पातळी गाठली आहे. तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होत असताना अभियांत्रिकी अभ्यासक्रमात गुणवत्ता वाढली पाहिजे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : तंत्रज्ञानाने उच्च पातळी गाठली आहे. तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होत असताना अभियांत्रिकी अभ्यासक्रमात गुणवत्ता वाढली पाहिजे. सोबतच संशोधनाकडे कल वाढावा. अभियांत्रिकीतील शिक्षणाचा दर्जा हिच विद्यार्थ्यांच्या संशोधनातील ऊर्जा असते, असे परखड मत नागपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कुमथेकर यांनी व्यक्त केले.
सेवाग्राम येथील बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. एम.ए. गायकवाड, समन्वयक डॉ. डि.आर. दांडेकर, डॉ. पी. एल. नागतोडे, डॉ. एस.डब्लु मोहोड, प्रा. एम.एन. ठाकरे उपस्थित होते. डॉ. कुमथेकर यांनी विज्ञान व तंत्रज्ञानावर आयोजित ही परिषद अभियांत्रिकीमध्ये नवे बदल घडून आणेल असा आशावाद व्यक्त करीत काळानुरुप सर्व अभियांत्रिकी क्षेत्रात दर्जा वाढविण्यावर लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. अभियांत्रिकीत संशोधन क्षेत्राला मोठा वाव असून विद्यार्थ्यांना संशोधनाच्या प्रवाहात आणण्याकरिता प्रोत्साहन दिले पाहिजे असेही ते पुढे म्हणाले. यानंतर बोलताना प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी बदलत्या काळात संशोधनाचे महत्त्व व त्याप्रमाणे बदल करण्याकडे लक्ष वेधले हे मुलभूत संशोधन करण्यासाठी अभियांत्रिकी क्षेत्रातील सर्व घटकांनी सामूहिक प्रयत्न केले पाहिजे असे सांगितले. तर डॉ. दांडेकर यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेवर प्रकाश टाकला.
देशभरातील विविध संस्थेतील १३५ शोधनिबंधाची निवड झाली. डॉ. मोहोड यांनी उपस्थितांचे आभार मानले. समारोपीय कार्यक्रमाला आय.आय.टी. रुरकीचे डॉ. विश्वास सावंत, संस्था संचालक समीर देशमुख, प्रा. राजेश ठाकरे, प्रा. एस.ए. धांदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. खोंडे व प्रा. पाहुणे यांनी केले तर आभार प्रा. ठाकरे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.