गांधीजींचे विचार व कार्ये लोकांपर्यंत पोहचविण्याची गरज : प्रा. अपूर्वानंद झा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 07:39 PM2019-01-30T19:39:25+5:302019-01-30T19:40:47+5:30
गांधीजींच्या ७१ व्या पुण्यतिथी निमित्ताने सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान व वर्धा परिसरातील सहकारी यांच्यावतीने 'गांधींचा मृत्यू' यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
सेवाग्राम : गांधीजी या देशात जातीय समानता, अस्पृश्यता निवारण, सर्व धर्म समभाव, मूल्य या राष्ट्रात रूजविण्यासाठी कार्य करीत होते. कारण हा देश जेवढा हिंदूचा आहे तेवढाच या देशावर मुसलमानांचा अधिकार आहे, असे ते लोकांना सांगत. तर दुसरीकडे आपल्याच लोकांचा विरोध पत्करण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. देशात अल्पसंख्यकांना नैतिक अधिकाराचे संरक्षण मिळाले पाहिजे असा त्यांचा प्रयत्न होता. गांधीजींचे वचन, भजन करून स्मरण न करता त्यांचे विचार व कार्ये लोकांपर्यंत पोहचविण्याची गरज असल्याचे मत प्रा. डॉ. अपूर्वानंद झा यांनी मांडले.
गांधीजींच्या ७१ व्या पुण्यतिथी निमित्ताने सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान व वर्धा परिसरातील सहकारी यांच्यावतीने 'गांधींचा मृत्यू' यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आश्रमचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू तर अतीथी म्हणून सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही उपस्थित होते.
व्याख्यानात डॉ. अपूर्वानंद म्हणाले गांधीजींनी प्रार्थनेला खूप महत्त्व दिले होते. जिथे गांधीजी जात त्या ठिकाणी प्रार्थना होत असे. कलकत्ता येथे प्रार्थनेत कुराण आयात म्हणण्यावरून विरोध केला. बापूंनी समजावून सांगितले. प्रार्थना व वचने कायम ठेवली. बदल हा हळूहळू होत असतो. तसेच गांधीजी सुध्दा हळूहळू घडायला लागले. गांधीजींनी नेहमीच परिवर्तन स्विकारले होते. त्यांनी फक्त सत्याची पर्वा केलेली आहे.
देश स्वातंत्र्याच्या अंतिम टप्प्यात असताना दंगली शांत करणासाठी जाण्याचा निर्णय गांधीजींनी घेतला. तिथे जाण्यासाठी मोठा विरोध झाला. पण काही निवडक कार्यकर्त्यांना घेउन घाबरू नका, घर दार सोडू नका, हि़ंसा करू नका असे आवाहन करू लागले. भेटी, शांती आणि उपोषणामुळे तेथील हिंसा थांबविण्यात यश मिळाले.
गांधीजीवर सहा हल्ले झाले. यात एक सेवाग्राम आश्रम पुढे प्रकार घडला. बापूंना इंग्रजांनी मारले नाही. लाँर्ड माऊंटबॅटन व विंस्टन चर्चिल यांनी पण गांधीजींचे विचार व कार्य मानले होते. ब्रिटीश साम्राज्याला सर्वात जास्त धोका गांधीजी पासून असल्याचे ते मानत. गांधीजींना अभिप्रेत असलेला भारत हवा होता जो सनातन्यांना नको होता. गांधीजींचा खून झाला. तो पण प्रार्थनेला जाताना. नथूराम गोडसेने बापूंच्या पाया पडण्याचे नाटक करत गोळ्या झाडल्या. गांधीचा मृत्यू नाही तर हत्या झाली, असे डॉ. झा म्हणाले.
समारोप रघुपती राघव या भजनाने झाला. प्रास्ताविक टी. आर. एन. प्रभू, परिचय महादेव विद्रोही तर आभार प्रदर्शन अविनाश काकडे यांनी केले. कार्यक्रमाला सेवाग्राम आश्रम, नयी तालिम समिती, सर्व सेवा संघ, गांधी संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, वर्धेतील नागरिक उपस्थित होते.