अॅलर्जी टाळण्याकरिता प्रतिकार क्षमता उपाययोजनेची गरज
By admin | Published: March 3, 2017 01:48 AM2017-03-03T01:48:16+5:302017-03-03T01:48:16+5:30
धूळ, परागकण, रसायने, खाद्यपदार्थ अथवा काही किटकांमुळेही अनेकदा अॅलर्जीजन्य आजार निर्माण होतात.
सावंगी (मेघे) येथे आयोजित ‘अॅलर्जी’वरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिचर्चेतील सूर
वर्धा : धूळ, परागकण, रसायने, खाद्यपदार्थ अथवा काही किटकांमुळेही अनेकदा अॅलर्जीजन्य आजार निर्माण होतात. अशा विविध प्रकारच्या रोगप्रवणतेसाठी अॅलर्जी स्कीन प्रिक चाचणी करून त्यामागील कारणांचा शोध घेण्याची तसेच लसीकरणाद्वारे प्रतिकार क्षमता वाढविण्याच्या उपाययोजनांवर भर देण्याची गरज आहे, अशी भूमिका सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठात आयोजित अॅलर्सीवरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिचर्चेत मांडण्यात आली.
जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या कान, नाक व घसारोग विभागाद्वारे आयोजित अॅलर्जीवरील या पहिल्या राष्ट्रीय परिचर्चा कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या शैक्षणिक विभाग अध्यक्ष तथा अभिमत विद्यापीठाचे प्रकुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले. यावेळी, प्रकुलगुरू डॉ. व्ही.के. देशपांडे, कुलसचिव डॉ. ए.जे. अंजनकर, अधिष्ठाता डॉ. संदीप श्रीवास्तव, आयोजन समितीच्या अध्यक्ष तथा विभाग प्रमुख डॉ. श्रद्धा जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.
दोन दिवसीय परिचर्चेतील विविध सत्रात अॅलर्जी बर्डन अॅन्ड मेकॅनिझम आॅफ अॅलर्जी, क्लिनिकल डायग्नोसिस आॅफ अॅलर्जिक ऱ्हिनायटीज, फुड अॅलर्जी, ब्राँकिअल अस्थमा, अॅलर्जिक आय डिसीज, संदर्भित विकारांचे व्यवस्थापन आदी विषयांवर तज्ज्ञांनी सखोल व अभ्यासपूर्ण मांडणी केली. याशिवाय, स्कीन प्रिक टेस्टचे प्रात्यक्षिकही यावेळी देण्यात आले. ‘अॅलर्जी’वरील या परिचर्चेत नवी दिल्ली येथील डॉ. विजय वर्मा, बंगलुरू येथील डॉ. पेंडाकुर आनंद, मुंबईचे डॉ. डी.एम. त्रिपाठी, डॉ. विक्रम खन्ना यांच्यासह कान, नाक व घसारोगतज्ज्ञ डॉ. श्रद्धा जैन, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. अमोल समर्थ, पल्मोनोलॉजिस्ट डॉ. सुखांत बगाडिया, बालरोगतत्ज्ञ डॉ. सचिन धमके, त्वचारोगतज्ज्ञ डॉ. सोनिया जैन, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. आदिती गाडेगोने यांनी मार्गदर्शन केले. अॅलर्जीवरील आगामी संशोधन आणि उपचारप्रणाली निर्माण करण्यासाठी दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठातील राष्ट्रीयस्तरावरील ही परिचर्चा दिशादर्शक ठरली. या परिचर्चेेसाठी आयोजन समिती सचिव डॉ. प्रसाद देशमुख, डॉ. सागर गौळकर, डॉ. आशिष दिसावल, डॉ. भावना कांबळे, डॉ. नितीन इंगळे, डॉ. आदित्य तिवारी, किरण कांबळे, संजय कराळे यांच्यासह कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.(प्रतिनिधी)