स्वयंरोजगारासाठी अंगी कौशल्य गुण गरजेचा
By admin | Published: February 7, 2017 01:07 AM2017-02-07T01:07:53+5:302017-02-07T01:07:53+5:30
केवळ पदवी प्राप्त करून रोजगाराच्या संधी मिळत नाही. यासाठी स्वत:मध्ये कौशल्य गुण आवश्यक आहे. ज्यांच्यात कौशल्य गुण आहे.
शैलेश नवाल : वर्धेत रोजगार मेळावा
वर्धा : केवळ पदवी प्राप्त करून रोजगाराच्या संधी मिळत नाही. यासाठी स्वत:मध्ये कौशल्य गुण आवश्यक आहे. ज्यांच्यात कौशल्य गुण आहे. त्यांना रोजगाराची संधी हमखास उपलब्ध होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आयोजित रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी केले.
स्थानिक विकास भवन येथे दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान, नगर परिषद आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष अतुल तराळे, न.प.उपाध्यक्ष प्रदिपसिंह ठाकूर, सभापती शबाना परविन, श्रेया देशमुख, नागपूरचे कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे उपसंचालक सुनील काळबांडे, न. प. च्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, जिल्हा अग्रणी बॅँकेचे जिल्हा व्यवस्थापक वामन कोहाड, अशोक गवई यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल पुढे म्हणाले, दुसऱ्याची तुलना न करता मनुष्याने जीवनामध्ये ‘मला काय करायचे आहे’ हे ध्येय ठेवून काम केल्यास यश प्राप्त होऊन नावलौकिक होण्यास मदत होईल. शेती तंत्र यासारखे नवनवीन कौशल्य आत्मसात करावे. असे झाल्यास शेतीवर आधारित उद्योग व्यवसाय करण्यास मदत होऊन आर्थिक लाभ प्राप्त करता येईल, असे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी देशात ६५ टक्के तरुण असून या त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी पंतप्रधान कौशल्य विकास योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेंतर्गत तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणाचा केवळ लाभ न घेता प्रशिक्षितांनी स्वत:चा उद्योग उभारावा यासाठी बॅँकेमार्फत मुद्रा योजनेतून कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे सांगितले.
मार्गदर्शन करताना वामन कोहाड यांनी मुद्रा बॅँक योजना व कॅशलेस व्यवहार या विषयी मार्गदर्शन केले.