देशाला सुराज्याकडे नेण्याची गरज
By admin | Published: August 17, 2016 12:50 AM2016-08-17T00:50:18+5:302016-08-17T00:50:18+5:30
देशाला स्वराज्य मिळून आज ६९ वर्षे झाली आहे. आता या स्वराज्याचे सुराज्य बनविण्याची गरज असून यासाठी शासन प्रयत्नशील आहे;
मदन येरावार : स्वातंत्र्याचा ६९ वा वर्धापन दिन
वर्धा : देशाला स्वराज्य मिळून आज ६९ वर्षे झाली आहे. आता या स्वराज्याचे सुराज्य बनविण्याची गरज असून यासाठी शासन प्रयत्नशील आहे; पण जनतेनेही सक्रीय सहभागी होऊन आपले अमूल्य योगदान द्यावे, असे आवाहन उर्जा व बांधकाम, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मैदानावर राज्यमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस अधीक्षक अंकित गोयल उपस्थित होते.
येरावार पुढे म्हणाले की, स्वच्छ भारत मिशनच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली आहे. अभियान अधिक गतिमान करण्यासाठी २२ आॅगस्ट ते २ आॅक्टोबर दरम्यान स्वच्छ महाराष्ट्रासाठी ‘१८ लाख भेटी’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. शौचालय नसलेल्या १८ लाख कुटुंबांपर्यंत पोहोचून त्यांना पे्ररीत केले जाईल. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने एक वर्षात सर्व शौचालय बांधण्याचे नियोजन केले. या अभियानास लोकचळवळीचे स्वरुप देत शौचालयाचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनतेने सहभागी होत जिल्हा हागणदारीमुक्त करण्याच्या मोहिमेला गती द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत
वर्धा : सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्व जिल्ह्यात सायबर लॅब सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील सायबर गुन्ह्याच्या शोधासाठी मदत होईल, असेही ना. मदन येरावार म्हणाले. जिल्ह्यातील कृषी व पुरक उद्योगास चालना देऊन ग्रामीण भागातील आर्थिक विकासाचा दर उंचावण्यासाठी भूपृष्ठ वाहतुकीच्या दर्जात वाढ करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी राज्य शासनाने नागपूर-मुंबई हा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ७१० किमी लांबी व १२० मीटर रूंदी असलेला हा महामार्ग जिल्ह्यातील वर्धा, सेलू व आर्वी या तीन तालुक्यातून जाणार आहे. यात ३५ गावांचा समावेश आहे. या महामार्गावर जिल्ह्यात तीन ठिकाणी कृषी समृद्धी केंद्रे उभारण्यात येणार आहे. याच मार्गावर विमानासाठी आपातकालीन धावपट्टी वर्धा जिल्ह्यात तयार होणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या समृद्ध विकासाचा हा महामार्ग ठरेल, असेही ते म्हणाले.
यावेळी येरावार यांच्या हस्ते संत तुकाराम वनग्राम योजनेंतर्गत कारंजा, समुद्रपूर व आर्वी येथील वन व्यवस्थापन समितीला प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जिल्ह्यात दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतल्याबद्दल सामाजिक वनिकरण विभागाद्वारे वृक्ष लागवडीत सहभागी व्यक्ती, संस्था, शाळा व अधिकारी यांचा गौरव करून प्रशस्तीपत्र देण्यात आले. जिल्ह्यातील ४ जि.प. शाळांना आयएसओ मानांकन प्राप्त झाल्याबद्दल मुख्याध्यापकांना सन्मानित करण्यात आले. महिला बाल कल्याण विभागाच्या माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी स्वातंत्र्य संग्राम सैनिक, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, शालेय विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)