नागरिकांची स्वतंत्र राजकीय शक्ती उभारण्याची गरज - तुषार गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 08:00 PM2024-07-08T20:00:37+5:302024-07-08T20:01:07+5:30
सेवाग्राम येथे भारत जोडो अभियानची दोन दिवसीय बैठक
वर्धा : भाजप आणि आरएसएसचा लोकसभा निवडणुकीत पराभव करणे, हे आमचे अंतिम ध्येय असू शकत नाही. हे शॉर्ट टर्म काम आहे. आमचे अंतिम ध्येय समाजात सुधारणा करणे असावे. आम्हाला कोणत्याही राजकीय पक्षात सहभागी होण्याची गरज नाही, तर नागरिकांची स्वतंत्र राजकीय शक्ती उभारण्याचे काम करावे लागेल, असे प्रतिपादन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केले.
सेवाग्राम येथे आयोजित भारत जोडो अभियानाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही काही काळाकरिता लोकांना वाचवले. राजकीय पक्षांमध्ये शिथिलता आली आहे. मात्र, आम्हाला कायम सक्रिय राहावे लागेल. त्यासाठी दुहेरी रणनीती बनवावी लागेल. द्वेषाला लोकांच्या मनातून आणि मेंदूतून काढावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विजय महाजन यांनी अभियानाची स्थापना, अखिल भारतीय विस्तार, कामाचे स्वरूप व निवडणुकीतील कामगिरी यावर भाष्य केले. प्रा. आनंद कुमार यांनी नागरी संघटनांच्या कार्यकर्त्यांचा दृढ निश्चय आणि अनेक मार्गांनी होत असलेल्या दडपशाहीला पुरून उरल्याबद्दल कौतुक केले.
ज्येष्ठ अभ्यासक कुमार प्रशांत यांनी दीर्घकालीन कामाची गरज स्पष्ट करताना ‘भारत जोडो अभियाना’ने आपली पुढील भूमिका स्वतःशी स्पष्ट करण्याचे आवाहन केले. लोककेंद्री राजकारणाला अग्रक्रमाने मजबूत करण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली. ललित बाबर यांनी अध्यक्षीय भाषणात अभियानाच्या महाराष्ट्रातील कामाचा, रणनीतीचा आढावा घेतला. संविधानाला मानणाऱ्या पक्ष व संघटनांनी दाखवलेल्या एकीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी प्रस्ताव
दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला अभियानाचे निमंत्रक योगेंद्र यादव यांनी राजकीय ठराव मांडला. संविधानाच्या उद्देशिकेतील समानता व न्यायाच्या मूल्यांवर आधारित समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी परिघावरील समुदाय, तळागाळातील वंचित समूह यांची मोट बांधण्याची गरज असल्याचे ठरावात नमूद केले. समन्वय समितीच्या सदस्य उल्का महाजन यांनी अनुमोदन दिले. उपस्थितांनी ठरावातील मुद्द्यांवर मत मांडून सूचना केल्या. देशभरातून २५० च्यावर प्रमुख कार्यकर्त्यांचा अधिवेशनात सहभाग आहे. अधिवेशनात संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी प्रस्ताव पारित करण्यात आला.
अधिवेशनाला मान्यवरांची उपस्थिती
भारत जोडो अभियानच्या राष्ट्रीय स्तरावरील अधिवेशनात राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव, विजय महाजन, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, लोकतांत्रिक राष्ट्र निर्माणचे मार्गदर्शक प्रो. आनंद कुमार, राष्ट्रीय सचिव कविता कुरुघंटी, महाराष्ट्र संयोजक उल्का महाजन, ललित बाबर, संजय मंगो, स्वाती मासगांवकर, अविक शहा, गांधी विचारक कुमार प्रशांत, सेवाग्राम आश्रमचे सचिव विजय तांबे, संविधान कार्यकर्ते राजू भिसे, फिरोज मिठीबोरवाला, माजी आमदार पंकज पुष्कर, आनंद माजगांवकर आदींसह देशभरातील सामाजिक व परिवर्तनवादी चळवळीतले प्रमुख कार्यकर्ते सहभागी आहे.
संकट संपले नसून कमजोर झाले - योगेंद्र यादव
अधिवेश्नाच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांनी आवश्यक प्रस्तावाचे वाचन व वर्तमान स्थितीत ‘भारत जोडो’ अभियानाची भूमिका विषद केली. त्यांनी देशावरील संकट सध्या संपले नसून ते कमजोर जरूर झाले, असे सांगितले. आपली लढाई कठीण आहे, असे सांगताना यादव म्हणाले, लोकसभेत भाजपजवळ बहुमत नाही, तर एडीएजवळ बहुमत आहे. इंडिया अलायंसकडे बहुमत नाही, पण त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. विरोधकांचा आवाज वाढला आहे. भारत जोडो अभियानाचा उद्देश लोकतंत्र आणि संविधान वाचविणे, असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सामाजिक सलोख्याकरिता काम आवश्यक
तुषार गांधी यांनी भारत जोडो अभियानाने विविध संघटना व कार्यकर्त्यांची मोट ज्या समर्थपणे बांधली, त्याचे कौतुक केले. आता नागरी संघटनांनी तटस्थ राजकीय भूमिका न घेता पुढील पाच वर्षांतील राजकीय हस्तक्षेपाचे नियोजन करावे, असे मत त्यांनी मांडले. तसेच सामाजिक सलोख्याकरिता यापुढे काम करण्याची गरज अधोरेखित केली. निवडणुकीत बहुमत कमी झाले असले तरी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेत काहीही बदल झाला नाही. त्याकरिता सामाजिक व राजकीय काम एकत्र करणे, गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.