जीवित हानी टाळण्यासाठी हेल्मेट वापरणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 11:59 PM2018-04-20T23:59:56+5:302018-04-20T23:59:56+5:30
गत दोन वर्षांच्या कालावधीत सुमारे ४०० व्यक्तींचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. अपघाती मृत्यू झालेल्यांपैकी एकानेही सुरक्षेच्या दृष्टीकोणातून हेल्मेटचा वापर केला नसल्याचे निदर्शनास आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गत दोन वर्षांच्या कालावधीत सुमारे ४०० व्यक्तींचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. अपघाती मृत्यू झालेल्यांपैकी एकानेही सुरक्षेच्या दृष्टीकोणातून हेल्मेटचा वापर केला नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे २३ एप्रिलपासून प्रत्येक दुचाकी चालकाने वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे अनिवार्य करण्यात आल्याची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गुरव यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
गुरव पुढे म्हणाले, ‘सडक सुरक्षा...जीवन की सुरक्षा’ या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून रस्ता सुरक्षा पंधरवाडा २३ एप्रिल पासून राबविण्यात येत आहे. या पंधरवाड्याच्या उद्घाटन कार्यक्रमापूर्वी सोमवारी सकाळी ७.३० वाजता शहरातून हेल्मेट बाबत जनजागृती करणारी दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहे. सोमवार २३ रोजीपासून दुचाकी चालविणाऱ्या प्रत्येकाला न्यायालयाच्या निर्देशानुसार हेल्मेटचा वापर करणे अनिवार्य आहे. २३ एप्रिल ते ७ मे या कालावधीत प्रारंभी कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस हेल्मेटचा वापर न करताना आढळून आलेल्या व्यक्तींना सुचना पत्र देणार आहे. परंतु, सुचना पत्र देऊनही त्या व्यक्तीने हेल्मेटचा वापर न केल्याचे आढळून आल्यास त्याच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ७ मे पासून जो व्यक्ती हेल्मेटचा वापर न करताना आढळून येईल त्याला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. २३ एप्रिलपासून हेल्मेट वापराबाबत वाहतूक नियंत्रण शाखा सक्ती नव्हे तर सुरक्षीत प्रवासाच्या दिशेने एक पाऊल टाकत असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
शासकीय कार्यालयांशी पत्र व्यवहार
१ एप्रिलपासून दुचाकी चालविणाऱ्या प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर प्रत्येक शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही हेल्मेटचा वापर करावा या हेतूने पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या मार्गदर्शनात विविध शासकीय कार्यालयातील प्रमुखांशी पत्र व्यवहार करण्यात आला आहे. इतकेच नव्हे वकिलांनीही हेल्मेटचा वापर करावा या उद्देशाने न्यायालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही पत्र व्यवहार करण्यात आला असल्याचे गुरव यांनी सांगितले.