गौतम बुद्धाच्या पंचशील विचारांची जगाला गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 12:06 AM2017-11-06T00:06:48+5:302017-11-06T00:06:59+5:30
गौतम बुद्धाचा धम्म हा महासागरासारखा आहे. यात सर्व जाती, पंथ, विचार आचाराचे लोक सामावून घेण्याची क्षमता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : गौतम बुद्धाचा धम्म हा महासागरासारखा आहे. यात सर्व जाती, पंथ, विचार आचाराचे लोक सामावून घेण्याची क्षमता आहे. जागतिक दहशतवादाच्या, आक्रमतेच्या, निराशेच्या आणि अनिश्चिततेच्या वातावरणात गौतम बुद्धाच्या पंचशील विचारांची गरज आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
यावेळी पर्यटन व ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, जिल्हा परिषद बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, सेलू पंचायत समितीच्या सभापती सुनिता खोडे, भन्ते सदानंद, सियाराम लोहकरे, सरपंच रेखा लोंढे, उपसरपंच फारुख शेख उपस्थित होते.
बोरधरण येथील बगीचा, केळझर येथील गणेश मंदिर परिसराचा विकास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराचा विकास, हजरत पीरबाबा टेकडी परिसर विकास अशा एकूण ५ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार आणि राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली. ज्यामुळे माणसाला माणसासारखे वागवले जाते. पण त्याहीपेक्षा त्यांनी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा धम्माची ओळख समाजाला करून दिली. शोषित वर्गाचे हित साधल्याशिवाय देशाची उन्नती साधली जाणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
७० वर्षाच्या कालखंडात पहिल्यांदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संविधानावर संसदेत चर्चा घडवून आणली हे सांगताना खा. रामदास तडस म्हणाले, बाबासाहेबांचा विचार आज घरा-घरापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. पहिल्यांदा जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी येतोय. त्यात पुन्हा पर्यटन विकास कामांची भर पडली आहे.
केळझरला तिनही धर्माचे उत्कृष्ट आणि नावाजलेले धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे केळझरला अ वर्ग पर्यटनाचा दर्जा मिळावा अशी मागणी आमदार पंकज भोयर यांनी प्रसंगी केली. आमदार कुणावार यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
सांस्कृतिक ठेवा जपण्याची आवश्यकता - मदन येरावार
आजच्या पिढीसमोर गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ओळख करून देण्याची गरज आहे. केळझरच्या भूमीवरून गत ४० वर्षांपासून धम्म परिषद आयोजित करून हा संदेश पोहचविण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे या परिसराचा विकास करण्यासाठी आणखी निधी देऊ असे मदन येरावार म्हणाले. आज संपूर्ण जगात युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा शांतीचा संदेश देणाºया बुद्धाची आठवण होते. युद्ध नको बुद्ध हवा, असे म्हणण्याशिवाय पर्याय राहत नाही. आपल्या पुर्वजांनी संस्कृतीचा ठेवा पुस्तक रूपात जतन केला आहे. त्यामुळे या पुस्तकांसाठी सुसज्ज ग्रंथालय याच कामात निर्माण करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच या सर्व विकास कामांसाठी पाठपुरावा करणारे आमदार पंकज भोयर यांचे कौतुकही केले.