देशाच्या प्रगतीसाठी सक्षम युवाशक्तीची गरज

By admin | Published: April 14, 2017 02:12 AM2017-04-14T02:12:27+5:302017-04-14T02:12:27+5:30

भारतातील एकूण लोकसंख्येच्या ३४ टक्के प्रमाण तरुणांचे आहे. इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या या युवाउर्जेची देशाच्या प्रगतीसाठी नितांत गरज आहे.

The need for youth power capable of nation's progress | देशाच्या प्रगतीसाठी सक्षम युवाशक्तीची गरज

देशाच्या प्रगतीसाठी सक्षम युवाशक्तीची गरज

Next

श्रीपाद नाईक : दत्ता मेघे आयुर्विज्ञान विद्यापीठाचा आठवा दीक्षांत समारोह
वर्धा : भारतातील एकूण लोकसंख्येच्या ३४ टक्के प्रमाण तरुणांचे आहे. इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या या युवाउर्जेची देशाच्या प्रगतीसाठी नितांत गरज आहे. त्यांच्यापर्यंत पोचणारा ज्ञानाचा स्त्रोत विज्ञानदृष्टी जोपासणारा, तर्कशुध्द विचारांचा, खुल्या मनाचा, आत्मसन्मान वाढविणारा, विश्वसनीय व जबाबदारीची जाणीव करून देणाराच असला पाहिजे. देशांतर्गत या युवा शक्तीला पुरेपूर वाव मिळाला तर ही शक्ती नोकरीसाठी परपराष्ट्रांकडे न वळता देशातच आपली सेवा देईल, असे प्रतिपादन भारत सरकारच्या आयुष खात्याचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या आठव्या दीक्षान्त समारोहात केले.
सावंगी (मेघे) येथील विद्यापीठ सभागृहात आयोजित या समारोहाच्या अध्यक्षस्थानी कुलपती दत्ता मेघे होते. कराडच्या कृष्णा आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती तथा द.मे. अभिमत विद्यापीठाचे मुख्य सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरू डॉ. दिलीप गोडे, प्र-कुलगुरू डॉ. व्ही.के. देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

६४२ विद्यार्थ्यांना दीक्षा
३४ जणांना आचार्य पदवी : ७८ जणांनी पटकाविले सुवर्ण पदक
वर्धा : आयुर्वेद ही जगातील सर्वात प्राचीन उपचार पद्धती असून भारत या पारंपरिक वैद्यक पद्धतीचा मुख्य प्रवाहक आहे. परंपरेने चालत आलेल्या आयुर्वेद, योगा, निसर्गोपचार, युनानी आदी आरोग्यवर्धक उपचार पद्धती अधिक उपयुक्त शास्त्रशुद्ध आणि निर्दोष होण्याकरिता व्यापक संशोधनाची आवश्यकता आहे. भारत सरकारने यासाठी आयुष हे स्वतंत्र खाते निर्माण केले आहे, असेही यावेळी ना. नाईक म्हणाले.
या समारोहात वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ३४ व्यक्तींना आचार्य पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठातील वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, पॅराविज्ञान आणि परिचर्या शाखेतील एकूण १०६ विद्यार्थ्यांना गौरवान्वित करण्यात आले. यात गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना एकूण ७८ सुवर्ण पदके व ३ रौप्य पदकांसह १३ चान्सलर अवॉर्ड आणि रोख पुरस्कार देण्यात आले. वैद्यकीय शाखेतील करिश्मा माखिजा ही विद्यार्थिनी सर्वाधिक पुरस्कारांची मानकरी ठरली. तिने १० सुवर्ण पदके व ५ पुरस्कारांवर आपली मोहर उमटविली. यासोबतच डॉ. स्नेहील गोस्वामी यांना ७ सुवर्ण पदके, जुही गुप्ता हिला ४ सुवर्ण पदके, डॉ. अनुजा आलोक राणीवाला यांना ४ सुवर्ण पदके, रोमा धांडे हिला ३ सुवर्ण पदके व १ रोख पुरस्कार, अमृता बटवे हिला १ सुवर्ण व ३ रोख पुरस्कार तर मंजू मोहन हिला २ सुवर्ण व १ रौप्य पदक प्राप्त झालेत. तर १९ विद्यार्थ्यांना फेलोशिप प्रदान करण्यात आली. वैद्यकीय शाखेतील ३००, दंतविज्ञान शाखेतील १४९, आयुर्वेद शाखेतील ५९, परिचर्या शाखेतील ११३ त२ पॅरावैद्यकीय शाखेतील १९ विद्यार्थ्यांसह एकूण ६४२ विद्यार्थ्यांनी कुलपती दत्ता मेघे यांनी आरोग्यसेवेची दीक्षा दिली.
मंचावर व्यवस्थापन मंडळाचे सदस्य सागर मेघे, आ. समीर मेघे, अशोक चांडक, डॉ. नीलम मिश्रा, मुख्य समन्वयक डॉ. एस.एस. पटेल, कुलसचिव डॉ. ए.जे. अंजनकर, वैद्यकीय शाखेचे अधिष्ठाता डॉ. संदीप श्रीवास्तव, दंतविज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. अशोक पखान, आयुर्वेद शाखेचे अधिष्ठाता डॉ. श्याम भुतडा, डॉ. डी.के. अग्रवाल, डॉ. सतीश देवपुजारी, डॉ. मीनल चौधरी, डॉ. राजीव बोरले, रवी मेघे, डॉ. ललित वाघमारे, परिचारिका महाविद्यालयाचे प्राचार्य बी.डी. कुळकर्णी, भौतिकोपचार शाखेचे डॉ. सोहन सेलकर, व्यवस्थापन समितीचे राजीव यशराय, डी.एस. कुंभारे, डॉ. सुब्रत सामल, डॉ. आदर्शलता सिंग, डॉ. प्रीती देसाई, डॉ. सुनीता श्रीवास्तव, वैशाली ताकसांडे यांची उपस्थिती होती.
प्रारंभी डॉ. गोडे यांनी अ‍ॅड. मनोहर व डॉ. मिश्रा यांच्या कार्याचा आलेख मांडला. डॉ. अंजनकर यांनी अ‍ॅड. व्ही.के. मनोहर यांच्या मनोगताचे वाचन केले. संचालन डॉ. तृप्ती वाघमारे व डॉ. समर्थ शुक्ल यांनी केले. समारोहाची सांगता डॉ. प्रियंका निरंजने यांनी गायलेल्या पसायदान व राष्ट्रगीताने करण्यात आली. दीक्षान्त समारोहाला मोठ्या संख्येने पदवीधर, त्यांचे पालक व शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The need for youth power capable of nation's progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.