निष्काळजीपणा; शिक्षण हक्कावर टाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 10:12 PM2019-05-17T22:12:44+5:302019-05-17T22:13:26+5:30
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के मोफत प्रवेशासाठी पहिल्याच सोडतीमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेशासाठी शाळा किंवा जिल्हा परिषद शिक्षण विभागाशी संपर्क साधला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील २७३ विद्यार्थी आता प्रवेशाकरिता अपात्र ठरले आहे.
आनंद इंगोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के मोफत प्रवेशासाठी पहिल्याच सोडतीमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेशासाठी शाळा किंवा जिल्हा परिषद शिक्षण विभागाशी संपर्क साधला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील २७३ विद्यार्थी आता प्रवेशाकरिता अपात्र ठरले आहे. अपात्र ठरलेल्या या विद्यार्थ्यांना आरटीईतील प्रवेशापासून वंचित रहावे लागणार असून पालकांच्या निष्काळजीमुळेच या विद्यार्थ्याच्या ‘शिक्षण हक्का’ वर गदा आल्याचे दिसून येत आहे.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता जिल्ह्यातील आठही तालुक्यातील १३३ शाळांमध्ये १ हजार ४०३ जागांसाठी सुरु असलेल्या आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ३ हजार ९९५ आॅनलाईन अर्ज आले. त्यासाठी झालेल्या पहिल्या सोडतीत १ हजार १०७ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले. पहिल्या फेरीत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांना वेळोवेळी मोबाईलवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून माहिती देण्यात आली. प्रवेशाकरिता दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. तरीही १० मे या अंतिम तारखेपर्यंत जिल्ह्यातील पालकांनी शाळा, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे संपर्क साधला नाही. परिणामी २७३ विद्यार्थी आरटीईच्या प्रवेशासाठी अपात्र ठरले आहे. विशेषत: पहिल्या फेरीत अपात्र ठरलेल्या या विद्यार्थ्यांना आता दुसऱ्या फेरीत प्रवेश घेता येणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना या मोफत प्रवेशापासून वंचित राहावे लागणार आहे.
कागदपत्रांअभावी १७ अर्ज ‘रिजेक्ट’
आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेत १७ अर्ज कागदपत्राच्या त्रुटीत अडकल्याने या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने अपात्र ठरविले आहे. यामध्ये देवळी व सेलू तालुक्यात प्रत्येकी एक, हिंगणघाट तालुक्यात दहा तर वर्धा तालुक्यात ५ असे एकूण १७ विद्यार्थी अपात्र ठरविण्यात आले आहे. यामध्ये जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र व जन्माचा दाखला आदी प्रमाणपत्रातच त्रुट्या आढळून आल्या. या १७ विद्यार्थ्यांपैकी जवळपास ४ ते ५ विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र हे महाराष्ट्राबाहेरील राज्यातील असल्याने त्यांना प्रवेशापासून मुकावे लागले. या विद्यार्थ्यांनी सर्वसाधारण प्रवर्गातून आॅनलाईन अर्ज केला असता तर त्यांच्या प्रवेश मिळाला असता, असे शिक्षण विभागाने सांगितले.
अपात्रतेत वर्धा तालुका अव्वल
आरटीईअंतर्गत आठही तालुक्यात काही प्रमाणात विद्यार्थी अपात्र ठरलेले आहेत. ज्यामध्ये कागदपत्रामधील त्रुटी किंवा संपर्क न करणे अशा कारणांचा समावेश आहे. सर्वाधिक १०० विद्यार्थी वर्धा तालुक्यात अपात्र ठरले आहे.
आर्वी तालुक्यात २०, आष्टी १७, देवळी ५५, हिंगणघाट ५०, कारंजा १३, समुद्रपूर ११ तर सेलू तालुक्यात ७ असे एकूण २७३ विद्यार्थी आरटीई प्रवेश प्रक्रि येत अपात्र ठरले आहेत. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार नाही.
पहिली फेरी संपली असून त्यातील प्रवेश प्रक्रियाही आटोपली. आता दुसरी फेरी २० मे नंतर होण्याची शक्यता शिक्षण विभागाने वर्तविली आहे.