पुतण्याने केली काकूची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 09:42 PM2019-07-02T21:42:40+5:302019-07-02T21:43:05+5:30
येथील यशवंतनगरातील दीपा खियानी (३५) यांची त्यांचाच पुतण्या वीरेंद्र गोपीचंद खियानी (२४) याने हत्या केली. ही घटना मंगळवारी घडली असून आरोपीने दीपाला लोखंडी रॉडने मारहाण केल्यानंतर दीपाचा मृत्यू झाला. मृत दीपा डेकोरेशन व्यावसायीक सुनील खियानी यांच्या पत्नी होत. या प्रकरणातील आरोपीला हिंगणघाट पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवाय त्याने गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : येथील यशवंतनगरातील दीपा खियानी (३५) यांची त्यांचाच पुतण्या वीरेंद्र गोपीचंद खियानी (२४) याने हत्या केली. ही घटना मंगळवारी घडली असून आरोपीने दीपाला लोखंडी रॉडने मारहाण केल्यानंतर दीपाचा मृत्यू झाला. मृत दीपा डेकोरेशन व्यावसायीक सुनील खियानी यांच्या पत्नी होत. या प्रकरणातील आरोपीला हिंगणघाट पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवाय त्याने गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
पोलीस सूत्रानुसार, दुपारी १२ वाजताच्या सुमारास दीपा हिचा पती सुनील खियानी हे संत कंवरराम सभागृहात कामानिमित्त गेले होते. त्यांना पुतण्या सचिनने काकुला मार लागला असून त्या पडल्याची माहिती दिली. त्यानंतर ते तातडीने घरी पोहोचले. त्यावेळी त्यांना पत्नी दीपा ही रक्ताचे थारोळ्यात पडून असल्याचे दिसून आले. त्यानंतर दीपाला कुटुंबीयांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दीपाला मृत घोषित केले. मृत दीपा आणि आरोपी वीरेंद्र यांच्यात घरातील रस्त्याच्या कारणावरून वाद झाला. शिवाय तो वाद विकोपाला जाऊन शाब्दिक चकमकीचे हाणामारीत रुपांतरण झाले. यातच वीरेंद्र याने दीपा हिला लोखंडी रॉडने मारहाण करून तिला गतप्राण केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सत्यवीर बंडीवार आपल्या चमुसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी घटनास्थळवरून काही नमूने आणि साहित्य जप्त घेतले आहे. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून वृत्तलिहिस्तोवर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सूरू होती. पुढील तपास पीएसआय जीतेश कानपूरे करीत आहे.
एक मजली इमारतीत तीन भावांचे वास्तव्य
यशवंतनगरातील एक मजली इमारतीत खियानी कुटुंबातील तीन भावांचा परिवार वास्तव्याला आहे. तळ मजल्यात गोविंद खियानी तर पहिल्या मजल्यावर सुनील खियानी आणि गोपीचंद खियानी यांचे कुटुंब राहते. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी दोन्ही कुटुंबीयांना एकच रस्ता आहे. याच घरातील रस्त्याच्या कारणावरून नेहमी खटके उडत होते. विशेष म्हणजे, १५ दिवसांपूर्वी दीपा हिने तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे गाठले होते; पण त्यानंतर तिला समज देत परत आणण्यात आले. मात्र, आज हा वाद चांगलाच विकोपाला गेल्याचे वास्तव असल्याची चर्चा परिसरात होत होती.
दीपा मुलींना नुकतीच शाळेत पोहोचवून आली होती
मृत दीपा हिला दोन मुली आहेत. लहान मुलगी सहावीत तर मोठी आठवीचे शिक्षण घेत आहे. सदर घटनेच्या काही मिनिटांपूर्वी दीपा ही दोन्ही मुलींना शाळेत पोहोचून आली होती. शिवाय, घटनेच्या वेळी ती घरी एकटी होती, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे.