नवे संकट; कपाशीवर चुरड्याचा प्रकोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 10:30 PM2018-09-06T22:30:17+5:302018-09-06T22:30:48+5:30
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत. गुलाबी बोंड अळी, सोयबीनवरील लष्करी अळी तर आता कपाशीवर पुन्हा चुरड्याने आक्रमण केले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ झाली असून शेतकरी चिंतेत आहे.
विनोद घोडे२२।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत. गुलाबी बोंड अळी, सोयबीनवरील लष्करी अळी तर आता कपाशीवर पुन्हा चुरड्याने आक्रमण केले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ झाली असून शेतकरी चिंतेत आहे.
चिकणी (जामणी) परिसरातील कपाशीवर मागील २० ते २५ दिवसांपासून चुरडा आला आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना कीड नियंत्रणाकरिता मोठ्या प्रमाणात औषधी फवारणीवर खर्च केला. तरीही चुरडा निघत नसल्यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाला आहे. चुरडा घालवण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध कंपनीच्या औषधीची फवारणी केली. यासाठी मोठ्याप्रमाणात खिसा खाली करावा लागल्याने आर्थिक बजेट कोलमडले आहे.फवारणीनतरही चुरडा कायम असल्याने शेतकऱ्यांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या वर्षी फक्त जून महिन्यातच एक-दोन वेळाच दमदार पाऊस झाला. परंतू अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.सध्या ढगाळी वातावरण आणि रिमझीम पाऊस असाच खेळ सुरु असल्याने चुरडा व इतर कीडने आक्रमण केले असावे, असा अंदाज शेतकऱ्यांकडून वर्तविला जात आहे. याकरिता कृषी विभागाने योग्य मार्गदर्शन करण्याची गरज व्यक्त होत आहे. कृषी विभागाकडे अनेक ठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने एका कृषी सहाय्यकाकडे चार ते पाच गावांचा कारभार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी त्यांचे दर्शन दुर्लभ झाले आहे.
कपाशीवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता फ्लोनीकामीड ५० , डब्ल्यू जी. २ ग्रॅम १० लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी तसेच गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षणाकरिता हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावे. नुकसानीची आर्थिक पातळी ओलांडण्यास नियंत्रणाकरिता क्लोरपायरीफॉस ३० टक्के, प्रवाही २५ मि.ली. किंवा प्रोफेनॉफॉस ५० टक्के, प्रवाही २० मि.ली. किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू.पी. २० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी.
साधना ढुमणे, कृषी सहाय्यक, चिकणी (जा.)