खांबावरील लिखाणामुळे नवा वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 08:54 PM2018-03-24T20:54:10+5:302018-03-24T20:54:10+5:30
येथील स्मशानभूमीची समस्या निकाली निघण्याची चिन्हे दिसत नाहीत. आतापर्यंत येथील दारूगोळा भंडार आणि नगरपरिषदेत वाद होता. आता ही जागा आपल्या मालकीची असल्याचे कुणी एका इसमाने स्मशानभूमीतील शेडच्या खांबावर लिहून ठेवले आहे. या लिखाणामुळे जागेच्या वादाचा त्रिकोण निर्माण झाला आहे.
प्रभाकर शहाकार।
आॅनलाईन लोकमत
पुलगाव : येथील स्मशानभूमीची समस्या निकाली निघण्याची चिन्हे दिसत नाहीत. आतापर्यंत येथील दारूगोळा भंडार आणि नगरपरिषदेत वाद होता. आता ही जागा आपल्या मालकीची असल्याचे कुणी एका इसमाने स्मशानभूमीतील शेडच्या खांबावर लिहून ठेवले आहे. या लिखाणामुळे जागेच्या वादाचा त्रिकोण निर्माण झाला आहे.
शहरातील पंचधारा स्मशानभूमीचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून रेंगाळतच आहे. कसल्याही मूलभूत सुविधा नसल्याने अंत्ययात्रेत येणाऱ्यांना रखरखते उन्ह, कोरडी पडलेले नदीचे पात्र, सावलीसाठी वृक्ष नाही की बसायला निवारा नाही. येथे येणाºयाला या सर्व गोष्टी पाहून जीवंतपणीच नरक आठवल्याशिवाय राहत नाही. जागेच्या वादात दोन वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेले सौदर्यीकरण रखडले कधी जागेवर केंद्रीय दारू गोळा भांडारातील सैनिकी प्रशासनाचा तर कधी खासगी जमीनदारांचा ताबा असल्याचे स्मशानभूती लावलेल्या फलकावरून दिसत आहे. तर कधी स्मशान भूमिची जागा खासगी जमीन मालकांकडून नगर परिषद विकत घेणार असल्याची शहरात चर्चा आहे. यामुळे ही जागा नक्की कुणाची याचे उत्तर अद्यापही अनुत्तरीतच आहे. दोन दशकापूर्वी तत्कालीन विधान परिषद सदस्य रामदास तडस यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून ओटे, टिनाचे शेड व बसण्यासाठी मोठे शेड बांधून दिले होते. ते आता कालबाह्य झाले दोन वर्षांपूर्वी माजी मंत्री व विद्यमान आमदार रणजित कांबळे यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून दोन कोटी रूपये देऊन सौदर्यीकरणाचे काम सुरू केले. या कामासाठी जुने काही शेड तोडण्यात आले तर सुरू करण्यात आलेले बांधकाम, स्थानिक सैनिकी प्रशासनाने या जागेवर आपला अधिकार दाखवित बांधकाम थांबविले नव्हे तर प्रवेशबंदीचा फलकही लावला. त्यामुळे सौदर्यीकरणाचे काम तर रखडलेच परंतु मध्यंतरीच्या काळात अंत्यसंस्काराच्या शेडजवळ व शेडच्या पिलर्सवर शेत सर्व्हे नं २ हे.आर. १.९६ मौजा एकलासपूर ही जागा आपल्या मालकीची असल्याचे एका खासगी मालकाने सूचना लिहिली. त्यामुळे या जागेचा प्रश्न पुन्हा बिकट झाला. या जागेबाबत राज्य शासनाच्या संबंधीत विभागाकडून मोजमाप झाल्याचे व नगर परिषद स्मशानभूमिची ही जागा विकत घेणार असल्याचेही सांगण्यात आले होते.
नागरिकांना नरक यातना
अंत्ययात्रेत सहभागी असलेल्यांना स्मशानभूमीत बसायला सावली नाही की, प्यायला पाणी नाही. टिनाचे शेडही मोडकळीस आले आहे. सरणातून बाहेर पडणाऱ्या आगीच्या ज्वालामुळे नागरिकांना शेडपासून दूरच थांबावे लागते. स्मशानभूमीपर्यंत येणाऱ्या रस्त्याचीही दुरावस्था झाली आहे. नगर परिषदेद्वारे अनेकदा वृक्षारोपणाचे कार्यक्रमही पार पडले. परंतु वृक्ष संवर्धनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले.
सत्ताधाऱ्यांनी समस्या मार्गी लावण्याची गरज
सध्या नगर परिषदेसह राज्यात आणि केंद्रात भाजपाचे सरकार सत्तेत आहे. नगर परिषदही भाजपाच्या ताब्यात आहे. मग या स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर न येता रेंगाळत का? असा प्रश्न सर्वसामान्य मागणसात चर्चील्या जात आहे.