न्यू इंग्लिश शाळेच्या शिक्षकांचे धरणे आंदोलन
By admin | Published: June 8, 2017 02:36 AM2017-06-08T02:36:20+5:302017-06-08T02:36:20+5:30
वर्धा एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित न्यू इंग्लिश प्राथमिक शाळेत कार्यरत १५ शिक्षकांना सेवेतून कमी करून
मागण्या निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित न्यू इंग्लिश प्राथमिक शाळेत कार्यरत १५ शिक्षकांना सेवेतून कमी करून नव्याने नियुक्तीचा घाट घालणाऱ्या संस्थेवर योग्य कार्यवाही करण्यात यावी, या मागणीसाठी अन्यायग्रस्त शिक्षकांनी बुधवार ७ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी शिक्षकांच्या विविध समस्या तात्काळ निकाली काढण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. सदर निवेदनाची प्रत शिक्षणमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आली आहे.
या संस्थेने सेवा शर्थीचा भंग केल्याने या प्रकरणाची चौकशी करून अन्यायग्रस्त शिक्षकांना सेवेत रूजू करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. न्यू इंग्लिश प्राथमिक शाळेत (मराठी माध्यम) २००४ पासून १३ शिक्षिका व ३ शिक्षक कार्यरत होते. ही शाळा विना अनुदानित असून सर्व शिक्षकांचा दोन वर्षाचा प्रोबेशन कालावधी पूर्ण केला. त्यामुळे नियमानुसार सेवेत कायम झाले आहे;पण ३ ते १३ वर्षापासून कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना अचानक कार्यमुक्त करून नव्याने शिक्षक भरती करण्याची जाहिरात संस्थेने प्रकाशित केली. ही घटना महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी सेवा शर्ती अधिनियमांचा भंग करणारी असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
शासनाच्या प्रचलित नियमानुसार अनुदानास पात्र असताना संस्थाचालकांनी शासनाकडे त्यासंदर्भात प्रस्ताव पाठविला नाही. कोणत्याही शिक्षकाला नियुक्तीचा आदेश व सेवापुस्तिका दिली नाही. वेतनवृद्धी, नियुक्ती आदेश, सेवापुस्तिका अनुदान प्रस्ताव व अनियमितता दूर करण्यासाठी शिक्षण उपसंचालकाकडे मागील ३ वर्षापासून पाठपुरावा करून न्याय मिळाला नाही. नोकरीतून कमी करण्याचे षडयंत्र रचल्या जात आहे. मराठी शाळा बंद करून सीबीएससी शाळा वाढविण्याचे संस्थेकडून सांगितले जात आहे. हा प्रकार बेकायदेशीर आहे. सेवेतून कमी केल्याने जगण्याची भीती निर्माण झाली आहे. परिणामी, या प्रकरणाची सखोल चौकशी करून आम्हाला सेवेत कायम ठेवावे, अशी मागणी अन्यायग्रस्त शिक्षकांनी निवेदनातून केली आहे. धरणे आंदोलनात नंदा भटकर, सुनीता गळगटे, मनीषा दलाल, ममता उपसानी, मंगला इखार, स्वाती मोहतुरे, मनीषा नागपूरे, मनीषा लोणारकर, वैशाली महल्ले, वैद्य, प्रिया लामसोंगे, माधुरी टेकाम, हर्षल बुधोट, सूरज कोसूळकर आदी शिक्षक सहभागी झाले होते.