वर्ध्याचे नवे पालकमंत्री येत्या शुक्रवारी घेणार अधिकाऱ्यांचा दिवसभर तास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 01:45 PM2019-07-10T13:45:15+5:302019-07-10T13:47:44+5:30
जिल्ह्याच्या पालकत्वाची सूत्रे नुकतीच राज्याचे ऊर्जा, नवीनीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. येत्या शुक्रवारी (दि.१२) पहिल्यांदाच ते वर्ध्याच्या दौऱ्यावर येणार असून एकाच दिवशी तीन बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्याच्या पालकत्वाची सूत्रे नुकतीच राज्याचे ऊर्जा, नवीनीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. येत्या शुक्रवारी (दि.१२) नवे पालकमंत्री पहिल्यांदाच वर्ध्याच्या दौऱ्यावर येणार असून एकाच दिवशी तीन बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे दिवसभर अधिकाऱ्यांचा तास घेणार असून सर्व विभाग प्रमुख तयारीला लागले आहेत.
ऊर्जामंत्री झाल्यानंतर ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोरगाव (मेघे) येथील महावितरणच्या कार्यालयात जनता दरबार घेतला होता. यावेळी शेतकऱ्यांसह नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या समस्या त्यांच्यापुढे मांडल्या. समस्या ऐकून त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होता. तेव्हापासून त्यांच्या कार्यशैलीची ओळख वर्धेकरांना झाली आहे. आता जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनच जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच ते वर्ध्यात येत आहेत. शुक्रवारी सकाळी ते वर्ध्यात येणार असून दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर दुपारी ४ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांची, तर सायंकाळी ६ वाजता नगरपालिकेच्या सभागृहात नगरपालिकेच्या कार्याचा आढावा घेणार आहेत. एका दिवशी या तिन्ही बैठकांचे आयोजन केले असल्याने प्रशासनाचीही धावपळ सुरू आहे. सर्व विभागप्रमुख ‘अपडेट’ राहण्याकरिता धडपड करीत आहे.