नवे कामगार कल्याण केंद्र दीड वर्षांपासून बंदच

By admin | Published: May 21, 2017 01:07 AM2017-05-21T01:07:26+5:302017-05-21T01:07:26+5:30

शहरातील कॉटन मिल बंद झाला आणि शासनाने संलग्नित योजनाही गुंडाळल्या.

The new labor welfare center has been closed for one and a half years | नवे कामगार कल्याण केंद्र दीड वर्षांपासून बंदच

नवे कामगार कल्याण केंद्र दीड वर्षांपासून बंदच

Next

विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून तर कामगार सुविधांपासून वंचित
प्रभाकर शहाकार।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : शहरातील कॉटन मिल बंद झाला आणि शासनाने संलग्नित योजनाही गुंडाळल्या. मागणीनंतर १ आॅक्टोबर २०१५ पासून कामगार कल्याण केंद्र नवीन स्वरूपात सुरू करण्यात आले; पण सुरू झाल्यापासूनच हे कार्यालय बंदच आहे. परिणामी, विद्यार्थी, पालक व कामगार कुटुंबांचे शैक्षणिकदृष्ट्या मोठे नुकसान होत आहे.
पुलगाव कॉटन मील, विदर्भ सुपर फॉस्फेट कारखाना, बॅँक, परिवहन मंडळ आदी क्षेत्रात कार्यरत कामगार, कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक सुविधा, शिष्यवृत्ती, कामगार परिवारातील महिलांना विविध प्रकारच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा म्हणून शहरात अनेक वर्षांपासून कामगार कल्याण केंद्र कार्यरत होते. या उद्योगांतील कामगारांना आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी म्हणून कर्मचारी राज्य विमा योजनेंतर्गत दवाखाना सुरू होता. आॅगस्ट २००३ मध्ये पुलगाव कॉटन मील बंद झाला आणि शासनाने सर्व योजना गुंडाळल्या. या प्रकारामुळे कामगार क्षेत्रात कार्यरत कामगार व त्यांच्या पाल्यांचे अतोनात नुकसान झाले.
मागील कित्येक वर्षे हे कार्यालय एका शाळेजवळ जीर्ण इमारतीत सुरू होते. त्याचा लाभ समाजातील घटक व विद्यार्थ्यांना मिळत होता. कामगार परिवाराला मिळत होत; पण पुलगाव कॉटन मील सोबतच हे कामगार कल्याण केंद्रही बंद झाले. शहरात पुन्हा नव्याने जयभारत टेक्सटाईल व बीईसी फर्टिलाईझर हा खत कारखाना सुरू झाला; पण कामगार कल्याण केंद्र बंदच आहे. वारंवार मागणी केल्यानंतर हे कामगार कल्याण केंद्र नव्याने सुरू करण्यात आले. १५ आॅक्टोबर २०१५ रोजी तत्कालीन नगराध्यक्ष मनीष साहू यांच्या अध्यक्षतेत या कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सदस्य रमेश सावरकर व प्रमोद मोहोड यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रारंभी हे कामगार कल्याण केंद्र काही दिवस सुरू होते; पण एक वर्षापासून कर्मचाऱ्याअभावी बंद आहे.
केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी कल्याण सहआयुक्त सतीश दाभाडे अकोला विभाग यांनी या कल्याण केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, महिलांसाठी शिवणकला वर्ग, शिशुमंदिर सुरू होणार असल्याची ग्वाही दिली होती; पण तसे काहीच झाले नाही. कामगार क्षेत्रातील कामगारांच्या वेतनातून दरवर्षी १२ रुपये वर्गणी कपात केली जाते; पण बंद कामगार कल्याण केंद्रामुळे विद्यार्थी, कामगार कुटुंबाचे नुकसान होत आहे. याकडे लक्ष देत केंद्र सुरू करून विद्यार्थी, कामगारांना न्याय देणे गरजेचे झाले आहे.

केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांचाही अभाव
पुलगाव कॉटन मीलसोबत बंद झालेले कामगार कल्याण केंद्र मागणीचा रेटा वाढल्याने नव्याने सुरू करण्यात आले; पण या केंद्रांत कर्मचाऱ्यांचा भरणा करण्यात आलेला नाही. परिणामी, उद्घाटनानंतर काही काळ अनियमित सुरू राहणारे केंद्र कालांतराने बंदच झाले. मागील एक वर्षापासून कामगार कल्याण केंद्राचे दारच उघडले गेले नसल्याचे सांगण्यात येते. या प्रकारामुळे कामगारांच्या कुटुंबीयांना शासनाच्या कुठल्याही योजनांचा लाभ मिळत नसल्याचेच चित्र आहे. शिवाय शिष्यवृत्तीपासूनही विद्यार्थी वंचित आहेत. कामगार कुटुंबातील महिलांना प्रशिक्षण दिले जात नाही. यामुळे स्वयंरोजगारातही मागासलेपण दिसते. याकडे लक्ष देत कल्याण केंद्र अद्ययावत करून सुरू करणे गरजेचे आहे.

 

Web Title: The new labor welfare center has been closed for one and a half years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.