सत्यशोधकी साहित्यातच देणार नवे आत्मभान

By admin | Published: February 13, 2017 12:36 AM2017-02-13T00:36:40+5:302017-02-13T00:36:40+5:30

महात्मा ज्योतिराव फुले यांची प्रेरणा स्वीकारण्यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणाऱ्या परिवर्तनवादी विचार स्वीकारुन पुढे गेले पाहिजे

New self-respect will be given in truth-finding literature | सत्यशोधकी साहित्यातच देणार नवे आत्मभान

सत्यशोधकी साहित्यातच देणार नवे आत्मभान

Next

भारत पाटणकर : परिसंवादात समीक्षकांनी घेतला विविध पैलूंचा वेध
वर्धा : महात्मा ज्योतिराव फुले यांची प्रेरणा स्वीकारण्यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणाऱ्या परिवर्तनवादी विचार स्वीकारुन पुढे गेले पाहिजे. कारण सत्यशोधकी साहित्यच नवे आत्मभान देऊ शकते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व कार्यकर्ते डॉ. भारत पाटणकर यांनी केले. व्यंकटराव गोडे साहित्य नगरीत आयोजित दहाव्या सत्यशोधक साहित्य संमेलनातील परिवर्तनवादी साहित्य प्रवाहांचा मूलस्त्रोत या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संशोधक डॉ. श्रीराम गुंदेकर तर वक्ते म्हणून डॉ. काशिनाथ बऱ्हाटे, डॉ. शंकर बोऱ्हाडे उपस्थित होते.
डॉ. भारत पाटणकर म्हणाले, प्रस्थापित मराठी साहित्य व सत्यशोधकी साहित्याचे मुलादर्श पूर्णत: वेगळे आहेत. भारतीय संविधानाला अभिप्रेत मूल्यांच्या आधारावर सत्यशोधक साहित्यातून शोषित व वंचितांचे प्रश्न मांडले जातात. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांच्या संयुक्त विचारातूनच सत्यशोधक साहित्य समृद्ध होणार आहे. त्यामुळे या साहित्याला बंदिस्त करू नका, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. श्रीराम गुंदेकर म्हणाले, नव्या लेखकांनी केवळ ललित लेखन न करता वैचारिक व संशोधनपर लेखन केले पाहिजे. सत्यशोधकी साहित्याने केवळ कलावादी मूल्यांशी बांधील असून जीवनवादी आशय हाच मुख्य गाभा आहे. त्यामुळे सभोवतीचे जगणे समजावून विवेकाच्या आधारावर लेखन करण्यासाठी पुढे आले पाहिजे. कारण हे साहित्य सर्व परिवर्तनवादी प्रवाहांचा मुलस्त्रोत ठरला आहे. डॉ. काशिनाथ बऱ्हाटे यांनी परिवर्तनवादी साहित्याचे वैशिष्टय अधोरेखित केले. डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी सत्यशोधक चळवळ व साहित्य यावर विवेचन केले. संचालन डॉ. सुधाकर सोनोने यांनी केले. आभार संजय गावंडे यांनी मानले. सायंकाळी सुषमा वासेकर यांनी ‘मी सावित्री बोलतेय’ हा एकपात्री नाटयप्रयोग सादर केला. आयोजनासाठी राजेंद्र कळसाईत, कपिल थुटे, गुणवंत डकरे, डॉ. प्रियराज महेशकर, प्रा. महाजन, प्राचार्य जनार्दन देवतळेंसह पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)

सत्यशोधकी स्त्रीवादावर चिंतन
रविवारी सकाळी ११ वाजता सुनीता काळे यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधकी स्त्रीवाद : भूमिका आणि वास्तव या विषयावर परिसंवाद झाला. प्रा. भगवान फाळके यांनी बीजभाषण केले. पुण्याच्या प्रा. प्रतिमा परदेशी व चंद्रपूर येथील कार्यकर्त्या शाहिदा शेख यांनी सत्यशोधकी स्त्रीवादाची मूलगामी मांडणी केली. संचालन डॉ. विद्या कळसाईत यांनी केले.

संभाजी भगतांची लोकशाहीरी
मुंबईचे प्रसिद्ध लोकशाहीर संभाजी भगत यांच्या उपस्थितीत सकाळी ११.३० वाजता मसत्यशोधकी माध्यमे व तरुणांचा सहभाग हा परिसंवाद झाला. अभ्यासक श्रीकांत बारहाते व राजेश मडावी यांनी विषयाची मूलभूत मांडणी केली. उमरखेडचे प्रेम हनवंते यांनी बीजभाषण केले. श्रोत्यांच्या आग्रहास्तव लोकशाहीर संभाजी भगत यांनी मचोर लुटेरे बैठे रे भाई ही शाहिरी सादर केल्याने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. संचालन प्रा. एकनाथ मुरकुटे यांनी केले तर आभार प्रदीप ताटेवार यांनी मानले.

काव्य संमेलन रंगले
प्रसिद्ध कवी डॉ. सुधाकर डेहनकर यांच्या अध्यक्षतेखाली रात्री आठ वाजता काव्यसंमेलन पार पडले. मानवी जगण्याचे ताणबाणे उलगडून दाखविणाऱ्या विविध जीवनवादी कवितांनी हे सम्मेलन चांगलेच रंगले. शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांपासून तर जीवनाचा सर्वांगीण वेध घेणाऱ्या कविता सादर झाल्याने रसिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काव्यसंमेलनात राज्यातील ६० कवी सहभागी झाले होते. संचालन प्रल्हाद पोळकर, माधुरी शोभा यांनी केले.

 

Web Title: New self-respect will be given in truth-finding literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.