‘त्या’ नवजात चिमुकलीची प्रकृती गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 10:01 PM2017-08-22T22:01:15+5:302017-08-22T22:02:23+5:30
गांजा तस्करीच्या प्रकरणात अटक असलेली आरोपी गर्भवती होती. अटकेच्या कारवाईनंतर लगेचच तिची सोमवारी प्रसूती झाली. यात सदर चिमुकलीची प्रकृती गंभीर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गांजा तस्करीच्या प्रकरणात अटक असलेली आरोपी गर्भवती होती. अटकेच्या कारवाईनंतर लगेचच तिची सोमवारी प्रसूती झाली. यात सदर चिमुकलीची प्रकृती गंभीर आहे. तिला उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.
आंध्र प्रदेशातून खरेदी केलेला गांजा अकोला येथे नेणाºया चव्हाण नामक दाम्पत्याला रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी सेवाग्राम रेल्वे स्थानकावरून रविवारी ताब्यात घेतले. यातील महिला गर्भवती असल्याने तिने जिल्हा सामान्य रुग्णालयात मुलीला जन्म दिला. मात्र तिचे वजन कमी असून तिच्या तोंडातून रक्त येत आहे. सध्या तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.
सेवाग्राम रेल्वे स्थानकावरून रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी चव्हाण नामक दाम्पत्याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २ लाख रुपयांचा २० किलो गांजा जप्त केला. दक्षिण एक्सपे्रसने सेवाग्राम रेल्वे स्थानकापर्यंतचा प्रवास करणाºया सदर दाम्पत्यासोबत आणखी काही जण होते. परंतु, या दोघांना ताब्यात घेल्याचे लक्षात येताच इतरांनी पळ काढला. तसेच ताब्यात घेतलेल्या चव्हाण नामक दाम्पत्यासोबत त्यांचा तीन वर्षीय मुलगा होता. यात अटक करण्यात आलेली महिला नऊ महिन्यांची गरोदर होती. असे असताना तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची गरज नव्हती असे काही पोलीस कर्मचारी बोलत होते.
सदर प्रकरण वर्धा लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करताच रविवारी सायंकाळी आरोपी गर्भवती महिलेला प्रसुती कळा सुरू झाल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात सदर आरोपी महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. परंतु, नवजात मुलीचे वजन कमी असल्याने तसेच मुलीच्या तोंडातून रक्त येत असल्याने मुलीसह मुलीच्या आईला मंगळवारी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास वर्धा लोहमार्ग पोलीस करीत आहेत.
देखभालीकरिता पोलिसांची कसरत
गांजा तस्करीत अटक केलेल्या महिलेची प्रसुती झाल्याने तिच्या देखभालीकरिता दोन कर्मचाºयांची नेमणूक केल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
आरोपी असलेल्या महिलेने एका कमी वजनाच्या मुलीला जन्म दिला आहे. बाळाच्या तोंडातून रक्त येत असल्याने नवजात मुलीसह मुलीच्या आईला इतर रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
- डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक वर्धा.