माता न तू वैरिणी! नवजात बाळाला फेकले उकिरड्यावर; वर्धा जिल्ह्यातील संतापजनक घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2022 04:48 PM2022-06-09T16:48:22+5:302022-06-09T17:11:46+5:30

पोलिसांनी देवदूताच्या रूपात येऊन मायेचा हात ठेवून आई बनून नवजात बालकाला ताब्यात घेत नवे जीवन दिले. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून पोलिसांकडून माता-पित्यांचा शोध सुरू आहे.

newborn infant allegedly tossed in roadside trash at wardha found alive | माता न तू वैरिणी! नवजात बाळाला फेकले उकिरड्यावर; वर्धा जिल्ह्यातील संतापजनक घटना

माता न तू वैरिणी! नवजात बाळाला फेकले उकिरड्यावर; वर्धा जिल्ह्यातील संतापजनक घटना

googlenewsNext
ठळक मुद्देहृदय पिळवटणाऱ्या घटनेने बोंदरठाणा गावात खळबळनिर्दयी माता-पित्यांचा शोध सुरू

वर्धा : ‘माता न तू वैरिणी...’ या उक्तीचा प्रत्यय देणारी संतापजनक घटना कारंजा तालुक्यातील बोंदरठाणा गावात उघडकीस आली आहे. चक्क आईनेच नुकत्याच तासभरापूर्वी जन्मलेल्या पोटच्या गोळ्याला उकिरड्यावर फेकून पाेबारा केल्याची हृदय पिळवटणारी घटना गुरुवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास उजेडात आली आहे. पोलिसांनी देवदूताच्या रूपात येऊन मायेचा हात ठेवून आई बनून नवजात बालकाला ताब्यात घेत नवे जीवन दिले. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून पोलिसांकडून माता-पित्यांचा शोध सुरू आहे.

‘बेटी म्हणजे धनाची पेटी’ यासारख्या अनेक उक्त्या किंवा म्हणी समाजात प्रचलित असल्या अथवा सरकारद्वारा स्त्रीभ्रूणहत्येविरोधी आणि मुलींसाठी विविध योजनांची खैरात केल असली तरी आजही समाजात मुलगी ही नकोशीच आहे. मात्र, चक्क आपल्या तान्ह्या बाळाला आईने उकिरड्यावर फेकून दिल्याने मुलीसारखी मुलगा ही नकोसा का झाला असावा, असा प्रश्न या घटनेतून उपस्थित होतो आहे. पोटच्या बाळाला फेकून देणं त्या निर्दयी मातेला खरंच काही वाटलं नसेल का, विशेष म्हणजे आईच्या गर्भातून बाहेर येताच या बाळाचा संघर्ष सुरु झालेला आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

बोंदरठाणा येथील रहिवासी दयाराम गजाम यांचे घर गावाच्या थोड्या दूर अंतरावर आहे. त्यांची पत्नी पहाटेच पाणी भरण्यासाठी उठली असताना घराच्या मागील परिसरातून नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज त्यांच्या कानी पडला. त्यांनी कुटुंबातील सदस्यांना सोबत घेत पाहणी केली असता त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. अवघ्या एक तासापूर्वी जन्मलेले बाळ त्यांच्या नजरेस पडले. त्यांनी तत्काळ याची माहिती आशासेविका आणि अंगणवाडीसेविकेला दिली. पहाटेचे २ वाजले होते. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन नवजात बालकाला ताब्यात घेतले आणि ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी निर्दयी माता-पित्याविरुद्ध कारंजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत यांनी दिली.

अर्भकाचे संपूर्ण शरीर होते मातीने भरलेले

गावाबाहेर असलेल्या उकिरड्यावर निर्दयी मातेने फेकून दिल्याने खळबळ उडाली. अर्भकाचे संपूर्ण शरीर मातीने भरलेले होते. नाळ ओली होती. अंगावर एकही कपडा नसल्याने बाळाचे संपूर्ण शरीर थंड पडले होते. पोलिसांनी तत्काळ अर्भकाला ताब्यात घेत ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ पाठविले.

नवजात बालकाला केले वर्धा ‘रेफर’

बाळ जन्मल्यानंतर त्याला आईच्या दुधाची गरज असते. पण, जन्मदात्रीच निर्दयी निघाल्याने बालकाला दूध मिळाले नसल्याने त्याची प्रकृती बिघडली. त्याला पावडरचे दूध पाजण्यात आले. पण, बाळ दूध पित नसल्याने नवजात बाळाला वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले.

निर्दयी माता गावातीलच?

पहाटेच्या सुमारास नवजात बालकाला कचऱ्याच्या उकिरड्यावर फेकून देण्यात आले. हे बाळ अनैतिक संबंधातून जन्माला तर आले नसेल ना, असा प्रश्न गावकऱ्यांमध्ये आहे. गावात उलटसुलट चर्चेला उधाण आले असून पोलीस त्या निर्दयी मातेचा शोध घेत आहेत. ती निर्दयी माता गावातीलच रहिवासी असेल, असा संशय पोलिसांना असून त्या दिशेने तपास सुरू आहे.

Web Title: newborn infant allegedly tossed in roadside trash at wardha found alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.