४८ तासात ४५० व्यक्तींना सूचनापत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 11:39 PM2018-04-25T23:39:47+5:302018-04-25T23:39:47+5:30
परिवहन विभाग व वाहतूक नियंत्रण शाखा वर्धाच्यावतीने २९ वे रस्ता सुरक्षा अभियान राबविल्या जात आहे. याच अभियानादरम्यान सुरक्षीत प्रवास या हेतूने प्रत्येक दुचाकी चालकाला यापूढे हेल्मेटचा वापर करणे क्रमप्राप्त करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : परिवहन विभाग व वाहतूक नियंत्रण शाखा वर्धाच्यावतीने २९ वे रस्ता सुरक्षा अभियान राबविल्या जात आहे. याच अभियानादरम्यान सुरक्षीत प्रवास या हेतूने प्रत्येक दुचाकी चालकाला यापूढे हेल्मेटचा वापर करणे क्रमप्राप्त करण्यात आले आहे. सदर अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमानंतर ४८ तासात हेल्मेटचा वापर न करणाऱ्या सुमारे ४५० वाहनचालकांना यापुढे हेल्मेटचा वापर करावा अशा आशयाचे सूचनापत्र वाहतूक पोलिसांच्यावतीने देण्यात आले आहेत. सदर व्यक्ती यापूढे हेल्मेटचा वापर न करताना आढल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्या जाणार आहे.
दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर न केल्याने विविध ठिकाणी झालेल्या रस्ता अपघातात मोठ्या प्रमाणात अनेकांना प्राण गमवावे लागल्याचे वास्तव आहे. त्यामुळे न्यायालयानेही याची दखल घेत सुरक्षीत प्रवासाच्या दृष्टीने योग्य पावले संबंधित प्रशासनाने उचलावित, अशा सूचना केल्या आहेत. न्यायालयाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून हेल्मेट सक्ती नव्हे तर लोकसहभागातून हेल्मेटचा वापर हा अभिनव उपक्रम वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेने २३ एप्रिलपासून हाती घेतला आहे. हा उपक्रम राबविताना कर्तव्य बजाविणारे प्रत्येक वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी हेल्मेटचा वापर न करणाºया व्यक्तीला सुरूवातीला सूचनापत्र देणार आहेत. हेल्मेटचा वापर न करणाºयांना वाहतूक पोलिसांकडून ७ मे रस्ता सुरक्षा पंधरवाड्याच्या समारोपीय कार्यक्रमापर्यंत सूचनापत्र दिले जाणार असले तरी पुर्वी ज्यांना सूचना पत्र देण्यात आले; पण त्यानंतरही ते वाहनचालविताना हेल्मेटचा वापर न करताना आढळून आले अशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. गत दोन दिवसात वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने हेल्मेटचा वापर न करणाºया सुमारे ४५० वाहनचालकांना सूचनापत्र देण्यात आले आहे. तर याच कालावधीत कुणालाही हेल्मेटचा वापर न केल्यामुळे दंड ठोठावण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले.
हेल्मेटमुळे वाचले दुग्ध व्यावसायिकाचे प्राण
भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यात दुग्ध व्यावसायीक सुधाकर काकडे रा. सुसुंद हे किरकोळ जखमी झाले. हा अपघात बुधवारी सकाळी ९ वाजता वर्धा-आर्वी मार्गावरील जुना पाणी चौकात झाला. दुचाकीचालक काकडे हे वाहनचालविताना हेल्मेट घालून असल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला नाही. हेल्मेटमुळेच पुढील अनर्थ टळल्याची चर्चा परिसरात होती.
नागरिकांनी सुरक्षीत प्रवास या हेतूने दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा. हेल्मेटचा वापर क्रमप्राप्त केल्यानंतर अनेक ठिकाणी हेल्मेटची विक्री होताना दिसते. कुठल्या कंपनीचे हेल्मेट आहे हे बघण्यापेक्षा ते आयएसआय मार्क आहे काय याची चाचपडताळणी करूनच हेल्मेटची खरेदी करावी.
- दत्तात्रय गुरव, पोलीस उपनिरीक्षक,
वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा.