नायजेरियन टोळीने घातला १४ लाखांनी गंडा
By admin | Published: June 14, 2017 12:48 AM2017-06-14T00:48:36+5:302017-06-14T00:48:36+5:30
दुर्धर आजारावरील औषधात उपयोगी असलेल्या अर्र्गानिया स्पिनोसा नामक बिया खरेदी करण्याची तयारी दाखवित....
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दुर्धर आजारावरील औषधात उपयोगी असलेल्या अर्र्गानिया स्पिनोसा नामक बिया खरेदी करण्याची तयारी दाखवित तळेगाव श्यामजीपंत येथील अरूण डाखोळे या पदवीधर युवकाला १४ लाखांनी गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी तळेगाव पोलिसांनी नायजेरियन टोळीतील तिघांना अटक केली आहे. हे तीनही आरोपी सध्या अमरावती पोलिसांच्या ताब्यात असून अमरावती येथील व्यापाऱ्यालाही या टोळीने ६० लाखांनी गंडा घातल्याचे समोर आले आहे.
माईक केवीन फिलीप उर्फ बोबो उर्फ कॉसमॉस आणि एमेको फेवर इफेसीना तसेच सुकेशनी उर्फ स्रेहा पांडूरंग दरेकर उर्फ आदिती शर्मा अशी अटकेत असलेल्यांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटकेतील नेमक्या कोणी अरूण डाखोळे याच्याशी संपर्क साधला हे अद्याप उघड झाले नसून पोलिसांचा तपास सुरू आहे.
अरगानिया स्पिनोसा जातीच्या या बिया दिल्लीतून विकत घ्याव्यात व आम्हाला विकाव्या, आम्ही या बिया इतर देशातून विकत घेतो, त्या भारतातही स्वस्तात मिळतात, त्यामुळे आम्ही या बिया भारतातून घेण्यास तयार आहो, अशी बतावणी करून हे फसवणुकीचे प्रकरण घडल्याचे समोर आले. या व्यवहाराकरिता तळेगावच्या पदवीधर युवकाने त्याच्याकडील कार गहाण ठेवून तसचे वडिलांना सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या रक्कमेतून ही रक्कम जुळवून खात्यात जमा केली. यातून सदर युवकाने खरेदी केलेल्या बिया घेण्यास कोणी आले नाही. या संदर्भात ज्या भ्रमणध्वनी क्रमांकाद्वारे या युवकासोबत संपर्क साधला होता तोही बंद मिळाला. काहीच उत्तर मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे या युवकाच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल झाली. वर्र्ध्याच्या सायबर क्राईम विभागाने तपास करून तिघांना अटक केली.