‘त्या’ चिमुकलीवर अतिप्रसंग झाल्याचे निष्पन्न
By Admin | Published: October 4, 2014 11:30 PM2014-10-04T23:30:43+5:302014-10-04T23:30:43+5:30
खेळत असलेल्या आठ वर्षीय चिमुकलीला एका तरुणाने खुल्या मैदानात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला़ ही बाब वैद्यकीय तपासात निष्पन्न झाली आहे. या प्रकरणात आरोपीची न्यायालयीन कोठडीत
आरोपीस एमसीआर : बलात्कार प्रकरणात वाढ
वर्धा : खेळत असलेल्या आठ वर्षीय चिमुकलीला एका तरुणाने खुल्या मैदानात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला़ ही बाब वैद्यकीय तपासात निष्पन्न झाली आहे. या प्रकरणात आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
गुरूवारी दि. २ आॅक्टोबरला सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास लहानुजीनगर परिसरात एक आठ वर्षीय चिमुकली मैत्रिणींसोबत खेळत होती. तेथे शेख तौलिब शेख शकिल हा १८ वर्षीय नराधम आला. त्याने त्या चिमुकलीला तुझ्या पप्पाने बोलविले आहे, असे सांगून तिला दुचाकीवर बसवून अग्रगामी शाळेलगत असलेल्या खुल्या जागेत नेले. तेथे तिच्यावर अतिप्रसंग केला. मुलगी घरी परत आली नाही म्हणून घरच्या मंडळींनी तिची सर्वत्र शोधाशोध केली; पण तिचा पत्ता लागत नव्हता. अखेर त्या चिमुकलीसोबत खेळत असलेल्या मुलीची विचारपूस केली असता तिने एका काकाने सोबत नेल्याचे सांगितले. यानंतर घरच्या मंडळींनी त्या दिशेने धाव घेतली असता तो नराधम तिला घेऊन परत येताना दिसला. तो चिमुकलीला सोडून पसार होण्याच्या बेतात असताना चिमुकलीच्या घरच्या मंडळींनी त्याला पकडून शहर पोलिसांच्या हवाली केले. सुरूवातीला त्या युवकाने चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला असावा, असा संशय होता; पण वैद्यकीय अहवालात अतिप्रसंग झाल्याची बाब निष्पन्न झाली. या प्रकरणात पोलिसांनी शेख तौलिब शेख शकिल याला न्यायालयात हजर केले होते. यात आरोपीला एक दिवस पोलीस कोठडी ठोठावली. अतिप्रसंग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला पुन्हा न्यायालयात हजर करून न्यायालयीन कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली. प्रकरण गंभीर असताना पोलिसांनी आरोपीस न्यायालयीन कोठडीची मागणी केल्याचा आरोप पिडीताच्या नातलगांनी केला आहे.
ठाणेदार मुरलीधर बुराडे म्हणतात, पहिल्यांदा न्यायालयात आरोपीला न्यायालयात नेले असता न्यायालयाने उशिरा न्यायालयात आणल्यावरून फटकारले होते. तेव्हा केवळ एक दिवसाची कोठडी सुनावली. पुन्हा पोलीस कोठडी ठोठावल्यानंतर आम्ही या अनुषंगाने न्यायालयीन कोठडीची मागणी केली. ती न्यायालयाने मान्य केली. प्रकरण गंभीर आहे, या अनुषंगाने सर्व चौकशी पूर्णत्वास नेली आहे. आरोपीविरूद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याची शिक्षा व्हावी, या दिशेने पोलीस तपास करीत आहे. पूढील तपास पोलीस उपनिरीक्षक ममता सहस्त्रबुद्ध करीत आहेत़(जिल्हा प्रतिनिधी)