कृषी केंद्रांवर नऊ भरारी पथकांचा ‘वॉच’
By admin | Published: June 7, 2017 12:28 AM2017-06-07T00:28:16+5:302017-06-07T00:28:16+5:30
जिल्ह्यात कृषी निविष्ठा गुणनियंत्रणाकरिता तसेच कृषी केंद्रावर नजर ठेवण्यासाठी नऊ भरारी पथक तयार करण्यात आले आहे.
बाजारात बोगस बियाणे दाखल : शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात कृषी निविष्ठा गुणनियंत्रणाकरिता तसेच कृषी केंद्रावर नजर ठेवण्यासाठी नऊ भरारी पथक तयार करण्यात आले आहे. तसेच आठही तालुका स्तरावर प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली.
तक्रार निवारण समितीत बियाणे, खत व किटकनाशक यांचा होणारा काळाबाजार तसेच ज्यादा दराने विक्री, लिकिंग आदी तक्रारींचे निवारण करणार आहे. याकरिता टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला असून शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही.
जिल्हास्तरावर जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी, मोहीम अधिकारी, जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक, वजनमापे निरीक्षक यांचा भरारी पथकात समावेश असून तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, वजनमापे निरीक्षक यांचा समावेश आहे. जिल्हास्तरावर एक व तालुका स्तरावर असे तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले असून शेतकऱ्यांना यासंदर्भात कोणत्याही तक्रारी असल्यास तक्रार नमूद करण्याचे आवाहन कृषी विकास अधिकारी एस.एम. खळीकर यांनी केले आहे.
आर.आर. किंवा बी.जी.-३ नावाने बोगस बियाणे
बाजारात महाशक्ती आर.आर. किवा बी.जी.-३ इत्यादी नावाने बियाणे येण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी बांधवानी सावधानी बाळगण्याचा सल्ला कृषी विभागाच्यावतीने देण्यात आला आहे. असे बियाणे कोणत्याही प्रकारची चाचणी न होता बाजारात आलेले असते. त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे नुकसान होते. अशा अनधिकृत खरेदी केलेल्या बियाण्याचे कोणतेही देयक किवा परवाना नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना अशा बोगस बियाण्यामुळे नुकसान झाल्यास कोणतीही नुकसान भरपाई शासनामार्फत देण्यात येत नाही.