जनावरांना होणाऱ्या ‘लेप्टोस्पायरोसीस’ आजाराने मनुष्यही प्रभावित; वर्धा जिल्ह्यात ९ रुग्ण ‘पॉझिटिव्ह’
By चैतन्य जोशी | Published: September 8, 2022 02:12 PM2022-09-08T14:12:21+5:302022-09-08T14:15:49+5:30
आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
वर्धा : जनावरांना होणारा ‘लेप्टोस्पायरोसीस’ हा आजार आता माणसांनाही होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात ९ जणांचे अहवाल लेप्टोस्पायरोसीस पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामुळे आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. जिल्ह्यातील तीन तालुक्यांत आरोग्य विभागाच्या चमूने नागरिकांच्या रक्ताचे नमुने संकलित करण्यास सुरुवात केली आहे.
जनावरांवर या रोगांचे आक्रमण झाल्याने जिल्ह्यातील पशुपालकांवर संकट कोसळले आहे. आरोग्य विभागाच्या चमूने जनावरांची तपासणी केली असता जनावरांना या आजाराने ग्रासल्याचे पुढे आले. ज्या गावातील जनावरांना या रोगाचे लक्षण आहे, तेथील जे लोक आजारी आहेत, त्यांचे रक्त नमुने संकलित केले असता ९ जणांना लेप्टोस्पायरोसीस आजाराने ग्रासल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. यामध्ये आर्वी तालुक्यातील रोहणा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या रसुलाबाद येथील ४, तर खरांगणा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या दासगाव गोंडी येथील ५ रुग्णांचा समावेश आहे. या सर्वांचे रक्त नमुने सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. अहवाल प्राप्त झाल्यावर ९ रुग्ण ‘लेप्टोस्पायरोसीस’ आजाराने ग्रासल्याची माहिती पुढे आली आहे.
आजाराची लक्षणे काय ?
जनावरांच्या संपर्कात आल्याने हा आजार जडण्याची भीती आहे. छोट्या कीटकांकडून पायावर दंश झाल्याने हा आजार होतो. लहान मुलांना जनावरांपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. तीव्र ताप, अंगदुखी, स्नायूदुखी, डोकेदुखी, डोळे लालसर होणे, सर्दी, खोकला आदी लक्षणे दिसून येतात. याकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी आर. जे. पाराडकर यांनी केले आहे.
आता माणसांनाही ग्रासले
हिंगणघाट तालुक्यातील उमरी येडे येथे पाच जनावरांचा लेप्टाेस्पायरोसीस आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर जि. प. पशुसंवर्धन विभागामार्फत गावातील सर्व जनावरांची तपासणी करण्यात आली. तपासणीत १९ जनावरांना थायलेरिओसीस हा आजार असल्याचे लक्षात आले. जिल्ह्यात आतापर्यंत २२ जनावरांचा अज्ञात आजाराने मृत्यू झाला आहे. त्यापैकी ५ जनावरांचा थायलेरिओसीसमुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे.
रक्त नमुने पाठविले सेवाग्राम रुग्णालयात
लेप्टोस्पायरोसीस आजाराची लागण आता मनुष्यालाही होत असल्याचे पुढे आले आहे. काहींचे रक्त नमुने सेवाग्राम येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. आर्वी तालुक्यातील रोहणा आरोग्य केंद्रात रसुलाबाद येथील ४ रुग्ण, खरांगणा आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या दासगाव गोंडी येथील ५ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
आर. जे. पाराडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प.