नऊ महिन्यांत १८ मुलींचे झाले अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 05:00 AM2020-10-15T05:00:00+5:302020-10-15T05:00:02+5:30
शालेय वयातच मुलांच्या हाती मोबाईल आले. फिल्मी स्टाईल, टवाळखोरांच्या अनुकरणाने नको त्या गोष्टी मुलांच्या अंगवळणी पडू लागल्या. एकीकडे पालक मुलांच्या करिअरसाठी अहोरात्र मेहनत घेतात. त्यांना चांगल्या शाळा, कॉलेजमध्ये घालतात. उच्च शिकवणी, मोबाईल, लॅपटॉपसह मोपेड, मोटरसायकल असे काही कमी पडू देत नाहीत. मुले नेमकी मोबाईल, लॅपटॉपवर व्यस्त राहतात. ती कोणत्या मित्र-मैत्रिणींच्या संगतीत आहे. याकडे मात्र, पालकांचे होणारे दुर्लक्ष हेच मुली पळून जाण्याचे अथवा पळवून नेण्याचे कारण समोर आले आहे.
चैतन्य जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : साहेब थोड नाजूक प्रकरण आहे...आमच्या मुलीला फूस लावून पळवून नेले...तिला अजून काही समजत नाही...प्लीज तिला शोधून काढा...अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या पालकांची संख्या लॉकडाऊन काळातही कमी झालेली नाही. नऊ महिन्यांत १८ हून अधिक मुली पळून गेल्याची नोंद जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत झाली आहे.
आज कुटुंबातील संवाद हरवत चालला आहे. शालेय वयातच मुलांच्या हाती मोबाईल आले. फिल्मी स्टाईल, टवाळखोरांच्या अनुकरणाने नको त्या गोष्टी मुलांच्या अंगवळणी पडू लागल्या. एकीकडे पालक मुलांच्या करिअरसाठी अहोरात्र मेहनत घेतात. त्यांना चांगल्या शाळा, कॉलेजमध्ये घालतात. उच्च शिकवणी, मोबाईल, लॅपटॉपसह मोपेड, मोटरसायकल असे काही कमी पडू देत नाहीत. मुले नेमकी मोबाईल, लॅपटॉपवर व्यस्त राहतात. ती कोणत्या मित्र-मैत्रिणींच्या संगतीत आहे. याकडे मात्र, पालकांचे होणारे दुर्लक्ष हेच मुली पळून जाण्याचे अथवा पळवून नेण्याचे कारण समोर आले आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. मुली पळून जाण्याच्या तपासात जर मुलगी अल्पवयीन असेल तर थेट अपहरण अशी नोंद होते. त्यानुसार तिचा शोध घेतला जातो. ज्याने हे कृत्य केले त्याच्यावर ह्यपोक्सोह्ण अंतर्गत कारवाई केली जाते. पळून गेलेल्या बहुतांशी मुली या सज्ञान होण्याच्या उंबरठ्यावर असतात. सज्ञान झाल्यानंतर त्या लग्न करुनच थेट पोलीस ठाण्यात हजर होण्याचे प्रमाण अधिक आहे. कोरोनाचे संकट सुरु झाले तसा लॉकडाऊन लागू झाला. प्रत्येक कुटुंब घरातच होते. तरीही त्या कुटुंबातील मुलीला पळवून नेणे अथवा ती पळून जाण्याचे प्रमाण मात्र, काही थांबले नाही. हे पोलीस ठाण्यांतील नोंदीवरुन स्पष्ट झाले. शाळा, महाविद्यालय बंद असल्याने दामिनी पथकाकडून होणारे समुपदेशनही सध्या थांबले आहे.
१३ ते २५ वयोगटातील मुलींचे प्रमाण जास्त
पोलीस सुत्रांनुसार, १३ ते २५ वयोगटातील मुली पळून जाण्याच्या नोंदी विविध पोलीस ठाण्यात दररोज दाखल होतात. यात ७० टक्के मुली या अल्पवयीन असून प्रियकरासोबत त्या पळून गेल्याची माहिती समोर येते. मुलगी वयात येत असतानाच तिला वेगवेगळी आमिषे दाखवून प्रेमाच्या जाळयात ओढले जाते. त्यांना पळून जाऊन लग्नाचे आमिष दाखविले जाते. त्यामुळे पळून जाण्यात अल्पवयीन मुलींचे प्रमाण जास्त आहे.
मुलींचा शोध सुरु
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत दररोज अल्पवयीन मुली पळून जाण्याच्या नोंदी होतात. यापैकी काही मुलींना परत आणण्यात यश मिळाले तर आजघडीला तब्बल १८ मुली अजूनही मिळालेल्या नाही. त्यामुळे पुन्हा ऑपरेशन मुस्कान राबविण्याची गरज आहे. लॉकडाउन काळात हे अभियान थांबले आहे. बेपत्ता असलेल्या मुलींचा शोध त्या त्या ठाण्यातील शोध पथकाकडून सुरु आहे.
पालकांनी सुसंवादातून मुलांचे मित्र बनावे. चांगल्या-वाईट गोष्टीची त्यांना जाण करुन द्यावी. त्यांच्यावर कोणत्याही गोष्टींचा भडीमार न करता त्यांच्या प्रात्येक समस्या समजून घ्याव्या.
-मेघाली गावंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भरोसा सेल.