९ वर्षांपासून युनियन प्रतिनिधींच्या निवडणुकीला बगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 11:39 PM2017-10-09T23:39:06+5:302017-10-09T23:39:24+5:30
मागील नऊ वर्षांपासून कामगार युनियनची निवडणूक घेण्यात आलेली नाही. यामुळे कामगारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : मागील नऊ वर्षांपासून कामगार युनियनची निवडणूक घेण्यात आलेली नाही. यामुळे कामगारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. कामगारांच्या समस्या सोडविण्यास प्रतिनिधी असमर्थ असून युनियनचे पदाधिकारी समस्यांकडे लक्ष देत नाही. यामुळे त्वरित निवडणूक घ्यावी, अशी मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांनी निवेदनातून केली आहे.
मागील एक वर्षापासून कंपनीने कामगारांचा करारनामा केला नाही. जुन्या अॅग्रीमेंटची मुदत संपल्याने नवीन अॅग्रीमेंट त्वरित करणे गरजेचे आहे; पण कामगार प्रतिनिधीचे याकडे पुर्णत: दुर्लक्ष होत आहे. यामुळे कामगार त्रस्त आहेत. जुना करारनामा तीन टप्प्यात केलेला आहे. यामुळे कामगारांचे अतोनात नुकसान झाले आहे. व्यवस्थापन व कामगार प्रतिनिधी यांच्या संगनमताने जुना करारनामा कामगारांच्या हिताचा नाही. यामुळे तो करार रद्द करून फॅक्टरी अॅक्टप्रमाणे कामगारांना दिलासा द्यावा, गिमाटेक्स इंडस्ट्रीज वणीची युनियन निवडणूक ३० दिवसांत घ्यावी व कामगारांचा करार करण्याची मागणी कामगारांनी निवेदनातून केली आहे.