शासकीय कर्मचाऱ्याचे कार्यालयातच ‘निद्रासन’
By admin | Published: May 26, 2017 12:56 AM2017-05-26T00:56:31+5:302017-05-26T00:56:31+5:30
शासकीय कार्यालये कामकाजासाठी की झोपण्यासाठी, हा प्रश्नच आहे. एक कर्मचारी शहरातील पशुधन विकास अधिकारी
कृत्रिम रेतन केंद्रात प्रकार : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शासकीय कार्यालये कामकाजासाठी की झोपण्यासाठी, हा प्रश्नच आहे. एक कर्मचारी शहरातील पशुधन विकास अधिकारी कार्यालयातच दुपारी ‘निद्रासन’ करीत असल्याचे दिसून आले. संबंधित अधिकाऱ्यांनाही यात काही गैर वाटत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भकास, पडक्या इमारती व घाणीच्या विळख्यात असलेल्या या कार्यालयात कामय कामे होतात, हाही प्रश्नच आहे.
शासनाच्या जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे पशुधन विकास अधिकारी जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र हे कार्यालय जी.एस. कॉमर्स कॉलेजसमोर आहे. या कार्यालयात गुरूवारी दुपारी १ वाजता एक कर्मचारी कुलर सुरू करून झोप घेत असल्याचे दिसून आले. दार बंद, खिडक्यांना पडदे व गेट मात्र उघडे, अशी स्थिती होती. आतमध्ये डोकावून पाहिले असता एक कर्मचारी खुर्चीवर बसून टेबलवर पाय ठेवत निद्रीस्त झाला होता.
पशुधन विकास अधिकारी म्हणून डॉ. अमित पाटील, सहायक पशुधन विकास अधिकारी म्हणून एस.व्ही. आसुटकर, व्ही.ओ. चिकाटे तर परिचर म्हणून एच.के. यावले व यु.डी. उईके हे पाच कर्मचारी येथे कार्यरत आहे. या कार्यालयाचा परिसर भकास असून मागील भागात पडक्या इमारती आहे. केवळ भिंती उभ्या असल्याने शासन, प्रशासनाचे किती दुर्लक्ष आहे, हे दिसते. मागील काही वर्षांपासून या परिसरात दिवसभर गुरे फिरताना दिसतात. ही गुरे कुणी कृत्रिम रेतन केंद्रात आणलेली नसून ती मोकाट असतात. कधी बंद तर कधी सुरू राहणाऱ्या या कार्यालयावर कुणाचाही वचक नाही. कर्मचारी कार्यालयातच झोपा काढत असल्याने हा शासकीय निधीचा अपव्यय नव्हे काय, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. शासन, प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
कार्यालय दररोज उघडले जाते. सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते ६ या वेळेत कामकाज होते. दुपारी कार्यालय बंद असते. एखादा कर्मचारी दुपारी तेथेच थांबला असेल म्हणून झोपला.
- डॉ. अमित पाटील, पशुधन विकास अधिकारी, वर्धा.