निशीगंधा वाड होणार जि.प. शिक्षण विभागाच्या ‘सदिच्छादूत’
By Admin | Published: July 6, 2017 01:01 AM2017-07-06T01:01:31+5:302017-07-06T01:01:31+5:30
अभिनयासह साहित्य व शिक्षण क्षेत्रातही रूची असलेल्या सिनेतारका निशीगंधा वाड यांनी बुधवारी दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेला भेट दिली.
जिल्हा परिषदेला दिली भेट : शिक्षणाच्या दर्जा वाढीबाबत चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अभिनयासह साहित्य व शिक्षण क्षेत्रातही रूची असलेल्या सिनेतारका निशीगंधा वाड यांनी बुधवारी दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेला भेट दिली. याप्रसंगी जि.प. शिक्षण विभागाच्या ‘सदिच्छादूत’ होण्यास त्यांनी होकार दर्शविला. शिवाय जि.प. शाळांच्या दर्जावाढीसाठी काय उपाययोजना करता येतील, याबाबत चर्चा करीत नाविण्यपूर्ण उपक्रमाचे कौतुकही केले.
जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांची सिनेतारका निशीगंधा वाड यांच्याशी नागपूर येथे भेट झाली. त्यांनी जि.प. प्राथमिक शाळा तसेच तेथील शिक्षणाचा दर्जा वाढीसाठी काय करता येईल, असा प्रश्न त्यांना केला होता. शिवाय जिल्हा परिषदेला भेट देण्याचे सूचविले होते. यावरून वाड यांनी आज जिल्हा परिषदेला भेट दिली. याप्रसंगी जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी त्यांचे स्वागत केले.
प्राथमिक शिक्षणाच्या दर्जा वाढीसाठी काय उपाययोजना करता येतील यावर चर्चा करण्यात आली. यात जिल्ह्यातील ९२७ पैकी सुमारे ७०० शाळा डिजिटल झालेल्या आहेत. उर्वरित शाळाही डिजिटल करायच्या आहे. यासाठी कशी मदत मिळू शकेल, यावरही चर्चा केली. पालकांचे जि.प. शाळांकडे आकर्षण वाढावे, प्राथमिक शिक्षणात सुधारणेसाठी जि.प. शिक्षण विभागाच्या ‘ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर’ व्हावे, असे त्यांना सूचविले. यावर त्यांनी होकार दर्शविला. यामुळे त्यांना जि.प. शिक्षण विभागाचे सदिच्छादूत करण्यावर विचार विनिमय करण्यात येणार आहे. शिक्षणाधिकारी, शिक्षण सभापती व पदाधिकाऱ्यांशी चर्चेनंतर यावर निर्णय घेणार असल्याचे जि.प. अध्यक्ष मडावी यांनी सांगितले.
नाविन्यपूर्ण उपक्रमाचे केले कौतुक
वर्धा जिल्हा परिषदेद्वारे ग्रामीण भागातील महिला, मुलींकरिता सॅनिटरी नॅप्कीन पुरविण्याची योजना राबविण्यात येणार आहे. याबाबत निशीगंधा वाड यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांनी नाविण्यपूर्ण योजना संबोधित कौतुक केले. ही योजना राज्यातील काहीच गावांत राबविली जाते. जिल्ह्याच्या सर्व गावांत ही योजना राबविणारी वर्धा जिल्हा परिषद एकमेव ठरणार आहे. हे नॅप्कीन ग्रामीण महिला, मुलींना केवळ पाच रुपयांमध्ये उपलब्ध होणार असल्याचेही अध्यक्ष नितीन मडावी यांनी सांगितले.