युनिक डिसेबल कार्डसाठी साडेपाच हजार दिव्यांगांची नोेंदणी
By admin | Published: July 10, 2017 12:49 AM2017-07-10T00:49:29+5:302017-07-10T00:49:29+5:30
दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच स्मार्ट कार्डच्या माध्यमातून मिळावा तसेच त्यांची नोंद केंद्रस्थानी ठेवत दिव्यांच्या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
स्वावलंबन मेळावा : वर्धेसह सेलूतील शिबिराने समारोप; सर्वच शिबिरात उसळली गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच स्मार्ट कार्डच्या माध्यमातून मिळावा तसेच त्यांची नोंद केंद्रस्थानी ठेवत दिव्यांच्या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. विविध ठिकाणी आयोजित शिबिरांचा रविवारी वर्धा व सेलू येथील शिबिराने समारोप झाला. देण्यात येणाऱ्या स्मार्ट कार्डकरिता जिल्ह्यात एकूण साडेपाच हजार दिव्यांगांनी नोंदणी केली.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून विविध तालुक्यात स्वावलंबन मेळावे झाले. आज आयोजित मेळाव्यादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्यांगांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून आॅनलाईन व आॅफलाईन नोंदणीकरिता एकूण २० काऊंटर तर दिव्यांगांचा विमा उतरविण्याकरिता आठ टेबल लावले होते. सदर मेळाव्याच्या यशस्वीतेकरिता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, डॉ. अनुपम हिवलेकर यांच्यासह १५० अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
वर्धा व सेलूच्या मेळाव्यात अपेक्षेपेक्षा जास्त दिव्यांग आल्याने काही दिव्यांगांना त्रास सहन करावा लागला.
अडीच हजार दिव्यांगांनी उतरविला दोन लाखांचा विमा
स्वावलंबन मेळाव्यात २ हजार ५०० दिव्यांगांनी आपला दोन लाखाचा विमा उतरविला. ३ ते ६५ वर्ष वयोगटातील दिव्यांगासह त्याच्या कुटुंबातील चार व्यक्तींना एक वर्षाकरिता या विम्याचे कवच देण्यात आले आहे. शिवाय दहा हजारपर्यंतच्या बाह्य रुग्ण सेवेचा लाभ मिळणार आहे. सावंगी (मेघे) येथील चमुने विमा उतरविण्याचे काम केले.
जबलपूरच्या चमूकडून आॅनलाईन नोंदणी
शिबिरात अलीमकोच्या जबलपूर येथील चमूने दिव्यांगांच्या अपंगत्वाची आॅनलाईन पद्धतीने नोंद घेतली. नोंद घेण्यात आलेल्या गरजूंना त्यांच्या दिव्यांगत्वानुसार कृत्रिम अंग उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या चमूने जिल्ह्यातील जवळपास १ हजार ५०० दिव्यांगांची नोंद केली.