मतदारसंघात ना भूमिपूजन ना पायाभरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 11:53 PM2019-03-05T23:53:51+5:302019-03-05T23:54:23+5:30
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार क्षेत्रातील एकूण ५१९ ग्रामपंचायतीपैकी २९८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्याने संपूर्ण जिल्ह्यातच आचारसंहिता लागली आहे. संपूर्ण जिल्ह्याला आचारसंहिता असलेला वर्धा जिल्हा हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार क्षेत्रातील एकूण ५१९ ग्रामपंचायतीपैकी २९८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्याने संपूर्ण जिल्ह्यातच आचारसंहिता लागली आहे. संपूर्ण जिल्ह्याला आचारसंहिता असलेला वर्धा जिल्हा हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात आता ना भूमिपूजन होणार ना पायभरणी. वर्धा आणि हिंगणघात या दोन मतदार संघातील सर्वाधिक ग्रामंपचायतीच्या निवडणुका असल्याने आचारसंहितेची या मतदार संघाला झळ बसली असून लोकप्रतिनिधींची गोचीच झाली आहे.
दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत भाजपाचीच सत्ता असल्याने वर्धा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघातील वर्धा व हिंगणघाट मतदार संघात भाजपचे आमदार आहेत तर आर्वी व देवळी विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे आमदार आहेत. शिवाय खासदारही भाजपाचे आहे. असे असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी उद्घाटने व पायाभरणीचा धडाका लावा, अशा सूचना दिल्या आहे. तसेच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ९ मार्चपासून लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. मात्र, वर्धा जिल्ह्यात २४ मार्चला २९८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर २६ ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुका होऊ घातल्याने या निवडणुकीची २० फेब्रुवारीपासूनच सर्वत्र आचारसंहिता जाहीर करण्यात आली. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या भूमिपूजन व पायभरणी कार्यक्रमावर विरजण पडले आहे. परिणामी लोकप्रतिनिधींचीही अडचण वाढली आहे. विशेषत: वर्धा व हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात भाजपाचेच आमदार असताना याच मतदार संघातील अर्ध्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने येथील लोकप्रतिनिधींना आता ना भूमिपूजन ना पायाभरणी करता येणार असल्याने गोची झाली आहे. ग्रामपंचायतीची आचारसंहिता संपताच लोकसभेची आचारसंहिता लागणार असल्याने या मतदारसंघात आता निवडणुकीपूर्वी कोणतीही विकासकामे करता येणार नाही.
बॅकडेटचा फंडा ठरतोय मदतगार
ग्रामपंचायतीच्या आचारसंहितेमुळे भूमिपूजन व लोकार्पणाला ब्रेक लागला आहे. तसेच कोणत्याही नवीन योजनेची घोषणा करता येत नाही आणि नवीन कामाचे कार्यारंभ आदेशही देता येत नाही. असे असले तरी काहींनी आपल्या मतदार संघातील किंवा महत्वाच्या ग्रामपंचायतीमधील कामाचे बँकडेटमध्ये कार्यारंभ काढण्याचाही खटाटोप चालविला आहे. त्यामुळे त्या कामांचे भूमिपूजन करता येणार आहे. परंतु, या गडबडघाईत अनेक कामांच्या दिशा व स्थानही चुकल्याचे बोलेल्या जात आहे. असे असताना आता या कामाचे लोकप्रतिनिधी भूमिपूजन करणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरालगतच्या ग्रामपंचायतींच्याही निवडणुका
वर्धा शहरालगतच्या दहा ग्रामपंचायती या सर्वात मोठ्या ग्रामपंचायती असून वर्धा विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकीवर परिणाम कारक ठरतात. या दहा ग्रामपंचायतीपैकी पिपरी (मेघे) ग्रामपंचायत वगळता सर्वच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका असल्याने आचारसंहिता लागली आहे. त्यामुळे या परिसरातील विकास कामे करण्यासाठी आता मोठी अडचण निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतींची आचारसंहिता संपताच लोकसभेची आचारसहिंता लागणार आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने आता या परिसरात विकासात्मक कामे नव्याने करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या विकास कामांवरच नागरिकांना समाधान मानावे लागेल.