‘नो’ हेल्मेट दुचाकीला ‘नो एन्ट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 11:28 PM2018-06-30T23:28:16+5:302018-06-30T23:29:35+5:30
दुचाकी चालविताना किंवा दुचाकीने प्रवास करताना हेल्मेटचा वापर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून क्रमप्राप्तच आहे. हेल्मेटमुळे रस्ता अपघातात अनेकांचे प्राण वाचल्याची बरीच उदाहरणे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दुचाकी चालविताना किंवा दुचाकीने प्रवास करताना हेल्मेटचा वापर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून क्रमप्राप्तच आहे. हेल्मेटमुळे रस्ता अपघातात अनेकांचे प्राण वाचल्याची बरीच उदाहरणे आहेत. ‘सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हेल्मेटचा वापर’ हा उपक्रम वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने राबविल्यानंतर २३ एप्रिलपासून जिल्ह्यात हेल्मेटचा वापर बंधनकारक करण्यात आला. याच पाश्वभुमिवर आता ‘नो’ हेल्मेट दुचाकीला महाविद्यालयात ‘एन्ट्री’च नाही, अशा आशयाचा आदेश वजा सूचना पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना दिल्या आहेत.
पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या सदर सुचनांचे पत्र जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने वितरित करण्यात येणार आहे. सध्या बाजारपेठेत ठिकठिकाणी हेल्मेटची विक्री होत आहे. मात्र, नागरिकांनीही शास्वत सुरक्षेच्या दृष्टीने आय. एस. आय. मान्यताप्राप्त हेल्मेटचीच खरेदी करून त्याचा नियमित वापर करावा. हेल्मेटच्या वापरा संदर्भात प्रभावी जनजागृती केल्यानंतर पूर्वी सुचना पत्र व त्यानंतर दंडात्मक कारवाई करणे वाहतूक पोलिसांनी सुरू केले. आतापर्यंत वर्धा शहरात कुठल्याही वाहनचालकावर हेल्मेटचा वापर न केल्याचा ठपका ठेवून दंडात्मक कारवाई करण्यात आली नसल्याचे सांगण्यात येते. परंतु, सदर मार्गदर्शनात्मक पत्रामुळे आता प्रत्येक दुचाकी चालकाला शहरातही हेल्मेटचा वापर करावा लागणार आहे. अन्यथा त्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. सदर प्रकरणी महाविद्यालयांमधील प्राचार्यांनी व संस्थाचालकांनी सुचनांना केंद्रस्थानी ठेवून योग्य पावले उचलण्याच्या सुचनाही करण्यात आल्या आहेत. प्रत्येकाने दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर केल्याने अनेक अनुचित प्रकार टाळता येऊ शकतात असा विश्वास वाहतूक पोलिसांना आहे.
विद्यार्थ्यांना पटवून देणार महत्त्व
हेल्मेटचा वापर कशासाठी हे तरुणांना पटवून देण्यासाठी वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी आता महाविद्यालय गाठून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सदर अधिकारी व कर्मचारी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना सुरक्षेच्या दृष्टीकोणातून दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करणे कसे गरजेचे आहे, हे सोप्या शब्दात समजावून देणार आहेत. शिवाय ते विषयाला अनुसरून विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणार असल्याचे सांगण्यात आले.
शहरातही वापरावे लागणार हेल्मेट
हेल्मेटसक्तीतून नगर पालिका तसेच महानगर पालिका अंतर्गत रस्त्याना सुट दिल्याचे बोलले जात होते. परंतु, पोलीस अधीक्षकांच्या सदर पत्राद्वारे मोटार वाहन कायदा १९८८ कलम १२९ अन्वये दुचाकी चालविणाऱ्या आणि तिच्यावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी दुचाकी वाहन चालविताना आयएसआय हेल्मेट प्रमाणित हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे.
या कलमांमध्ये सदर बाबतीत सुट देण्यात आलेली नसल्याचे पोलीस अधीक्षकांनी या पत्राद्वारे जणू स्पष्टच केल्याचे दिसते.
मोटर वाहन कायद्यान्वये होणार कारवाई
विना हेल्मेट वाहन चालविताना आढळून आल्यास त्याचेवर मोटर वाहन कायदा १९८८ कलम १२९/१७७(अ) अन्वये तसेच वाहनचालविण्याचा परवाना शिवाय दुचाकी चालविल्यास वाहनचालक व मालक यांच्यावर मोटर वाहन कायदा १९८८ कलम १८० अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.