न. प. विकास कामासाठी २५ कोटी दोन टप्प्यात देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:35 PM2018-10-31T23:35:18+5:302018-10-31T23:37:08+5:30
पालिका विकास कामामध्ये राज्य शासनाने वेळोवेळी विकास निधीचे कार्य केले आहे. येत्या काळात आर्वी न.प. विकास कामासाठी दोन टप्प्यामध्ये २५ कोटी देण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : पालिका विकास कामामध्ये राज्य शासनाने वेळोवेळी विकास निधीचे कार्य केले आहे. येत्या काळात आर्वी न.प. विकास कामासाठी दोन टप्प्यामध्ये २५ कोटी देण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
आर्वी न.प. प्रशासकीय इमारीच्या लोकार्पण कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर खा. रामदास तडस, आ. अनिल सोले, ना.गो. गाणार, अमर काळे, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यअधिकारी सुमित वानखेडे, माजी आमदार दादाराव केचे, नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, उपेंद्र कोठेकर, न. प. मुख्याधिकारी विद्याधर अंधारे, माजी खासदार विजय मुडे आदींची उपस्थिती होती.
ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, आर्वी शहर व नगर परिषदेसाठी यापुढेही विशेष निधी देण्याची जबाबदारी माझी आहे. विदर्भात आर्वी नगरपालिका ही आदर्श ठरावी यासाठी सर्वांनी झटण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. नियोजन, वेग, प्रयत्न या त्रि-सुत्रीतून आर्वी पालिकेने या नव्या वास्तूचं जतन करावं, वर्धा जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांना वित्तमंत्री म्हणून मी भरभरून मदत केल्याचेही यावेळी मुनगंटीवार यांनी सांगितले.
आर्वी न. प. च्या इमारतीची प्रतिकृती ही विधानसभेसारखी असल्याने या वास्तूतून आर्वीच्या जनतेच्या समस्या निकाली काढत आर्वीचा चेहरा बदलण्यासाठी कार्य व्हावे, असे यावेळी ना. मुनगंटीवार म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे यांनी केले. संचालन प्रा. नितीन बोडखे यांनी तर आभार मुख्याधिकारी अंधारे यांनी मानले. कार्यक्रमाला आर्वी शहरातील गणमान्य व्यक्तींसह उपस्थिती होती.