हरभऱ्याचे घरातच करावे लागणार काय फुटाणे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 01:09 PM2019-03-06T13:09:03+5:302019-03-06T13:12:02+5:30
काबाडकष्ट करून चणा पिकविला. मात्र, मागील आठवडाभरापासून भावात सातत्याने घसरण होत असल्याने शेतकऱ्यांना घरातच चण्याचे फुटाणे तर करावे लागणार नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुरुषोत्तम नागपुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : काबाडकष्ट करून चणा पिकविला. एकरी १० ते १४ क्विंटलपर्यंत उत्पादन झाले. मात्र, मागील आठवडाभरापासून भावात सातत्याने घसरण होत असल्याने शेतकऱ्यांना घरातच चण्याचे फुटाणे तर करावे लागणार नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हमी भावापेक्षा किमान १ हजार रूपये क्विंटल कमी भाव मिळत असून बाजारात चण्याची खरेदी ३ हजार ४०० रुपयांपर्यंत घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. हरभरा निघणे सुरू झाले, त्यावेळेस ४ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल भाव होता. बाजारात झपाट्याने आवक वाढताच चण्याचे भाव ३ हजार ४०० रुपयांवर आले. यामुळे शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघणे कठीण झाले आहे. उत्पादन खर्चाची जेमतेम तोंड मिळवणी होऊ शकेल. त्यामुळे शेतकऱ्यांचा नफाच गेला असून, शासनाने दीडपट भावाचे दाखविलेले शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळे आता घरातच घुगऱ्या कराव्या लागणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या हंगामात हरभऱ्याचा बाजार चांगलाच तेजीत होता. खासगीतही हमीभावाच्या बरोबरीने भाव मिळत होते. शासनाच्या पोर्टलवरही हरभरा चांगलाच भाव खाऊन गेला. त्यामुळे हरभऱ्याला चांगले दिवस येतील, असा शेतकऱ्यांचा समज होता. परंतु यावर्षीच्या मंदीने हा समज गैरसमज ठरत आहे. साडेचार हजारी पार केलेला हरभरा आता साडेतीन हजार रूपयांवर स्थिरावला आहे. आता हरभऱ्याचा हंगाम जोरात सुरू झाला. हंगामाच्या मध्यान्हात हरभरा आणखी खाली येईल का? अशी चिंता शेतकऱ्यांना पडली आहे. किमान उत्पादन खर्च निघण्याइतके दर मिळावे, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत.
शासनाची खरेदी कधी सुरू होणार आधारभूत किमतीमध्ये शासनामार्फत करण्यात येत असलेल्या हरभरा खरेदीला विलंब होत आहे. याचाही परिणाम खासगीत हरभऱ्याच्या बाजारावर पडतो. लहान-सहान शेतकरी अधिक काळ थांबू शकत नाहीत. शेतमाल विकून त्यांना रोजचे व्यवहार करावे लागतात. त्यामुळे असे शेतकरी शासनाच्या खरेदीची प्रतीक्षा न करता खासगीत माल विकून मोकळे होतात. त्यांना हमीभावाचा लाभ मिळू शकत नाही. शासनाच्या खरेदीला विलंब हे कारणदेखील हरभऱ्याचे दर पडण्याला कारणीभूत आहे. त्यामुळे चण्याचे घरातच फुटाणे फोडून द्यावे का? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
अधिक पिकले तर भाव पडतात, शेतकऱ्यांना हा अनुभव नवा नाही. कधी व्यापाऱ्यांकडून कवडीमोल भावात शेतमाल करून लूट केली जाते तर कधी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेती व्ळवसायात तोटा सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत करावे तरी काय, असा प्रश्न शेतकऱ्यांतून केला जात आहे.
लागवड खर्च निघणे अवघड
तेजीत आलेला हरभरा, हीच तेजी कायम ठेवणार, अशी आशा होती. मात्र, अधिक उत्पन्न आणि बाजारात आवक सुरू झाल्यानंतर आता चणा चांगलाच मंदीत आला आहे. साडेचार हजारांवर गेलेले हरभऱ्याचे दर गेल्या दोन आठवड्यापासून सातत्याने घटत आहेत. आर्वी बाजार समितीत साडेतीन हजारांपासून चण्याची खरेदी सुरू आहे. या दरात लागवड खर्चही निघणे कठीण झाले आहे.
शेतकऱ्यांचा चणा पूर्णपणे कमी भावात विकून झाल्यावर शेवटच्या टप्प्यात एक महिन्यानंतर शासनाची खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे.
- विनोद कोटेवार, प्र. सचिव.