ना साडी ना श्रृंगार, कर्तव्याचं लेणं घेऊन महिला पोलिसांचे ‘ऑनड्यूटी’ वटसावित्री पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2022 03:59 PM2022-06-14T15:59:24+5:302022-06-14T16:32:57+5:30
वटपाैर्णिमेचे औचित्य साधून रामनगर पोलीस ठाण्यातील महिला आणि शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या डौलदार वडाच्या झाडाचे पूजन केले.
वर्धा : वटपौर्णिमा म्हटलं की, घरात गोडाचं जेवण...देवाला नैवेद्य...नवीन साडी...श्रृंगार आदी अनेक गोष्टी आल्या... पण, पोलीस दलात काम करणाऱ्या या महिला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याला सुंदरतेचं लेणं मानून पोलीस गणवेशातच पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या वडाच्या डौलदार झाडाची पूजा करून वटवृक्षाला फेऱ्या मारून कर्तव्यासह पतीव्रता धर्म निभाविल्याचे दिसून आले.
वटपाैर्णिमेचे औचित्य साधून रामनगर पोलीस ठाण्यातील महिला आणि शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या डौलदार वडाच्या झाडाचे पूजन केले. यावेळी महिला पोलिसांनी खाकी वर्दी परिधान केली होती.
पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी सतत २४ तास सेवा देतात. मात्र, वटपौर्णिमेचे औचित्य साधून पतीव्रता धर्माचेही त्यांनी पालन करुन कर्तव्याबरोबरच रूढी-परंपरा कायम ठेवून स्त्रीचं आणि तिच्या कर्तव्याचं एक अनोखं रूप आपल्याला दाखवलं आहे.
कोरोना संकट जाऊ दे, पतीला दीर्घ आयुष्य लाभू दे
शहर पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या वडाच्या झाडाची पूजा करून कोरोनाचे संकट जाऊ दे, तसेच माझ्या पतीला दीर्घ आयुष्य लाभू दे, असे साकडे वटवृक्षासमोर घालून फेऱ्या मारल्या.
खाकी वर्दीतही जोपासले संस्कार
शहर आणि रामनगर पोलीस ठाण्यातील महिला पोलिसांनी वटवृक्षाचे पूजन केले. यावेळी त्यांनी सांगितले की, कर्तव्याला प्राधान्य देऊन आम्ही आज आपले संस्कारही जोपासले आहेत. परंपरेनुसार वटवृक्षाचे पूजन केले आहे. खाकी वर्दीत वटपौर्णिमा साजरी करणे ही आमच्यासाठी गर्वाची बाब असल्याचे महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले.