वर्धा जिल्ह्यात हागणदारी मुक्तीचे कागदी घोडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 12:58 PM2020-12-09T12:58:44+5:302020-12-09T13:08:35+5:30
Wardha news मार्च २०१८ मध्ये वर्धा जिल्हा हागणदारीमुक्त झाला ५१३ ग्रामपंचायतीमधील सुमारे एका लाखावरील कुटुंबीयांकडे वैयक्तिक शौचालये असल्याचे कागदावर दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मार्च २०१८ मध्ये जिल्हा हागणदारीमुक्त झाला ५१३ ग्रामपंचायतीमधील सुमारे एका लाखावरील कुटुंबीयांकडे वैयक्तिक शौचालये असल्याचे कागदावर दिसून आले. परंतु, त्यानंतर सुद्धा ग्रामीण भागातील नागरिक उघड्यावर शौच करण्यास जात असल्याचे वास्तव आहे. परिणामी, जिल्ह्यात हागणदारीमुक्तीचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. ‘स्वच्छ भारत अभियाना’ अंतर्गत ग्रामीण भागात शौचालय बांधण्याचा कार्यक्राम राबविण्यात आला. त्यासाठी २०११ मध्ये पायाभूत सर्वेक्षणाचा आधार घेण्यात आला. ५१३ ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी नियाेजन करण्यात आले. दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) आणि दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) लाभार्थी कुटुंबांना शौचालय बांधकामासाठी प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले. मार्च २०१८ मध्ये जिल्ह्यातील सव्वालाख कुटुंबाकडे शौचालये असल्याचा दावा करण्यात आला. असे असले तरी प्रत्यक्षात मात्र, जिल्ह्यातील चित्र वेगळेच आहे. ग्रामीण भागात अजूनही नागरिक उघड्यावरच शौच करण्यास जात आहेत.
गाववेशीपासूनच सुटतेय दुर्गंधी
जिल्हा हागणदारीमुक्त झाल्याची नोंद शासन दरबारी करण्यात आली आहे. त्यानंतर सुद्धा खेडेगावांतच नाही तर शहरी भागात देखील उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या कमी नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूने शौचास अनेकजण बसतात. परिणामी, गावाच्या वेशीपासूनच दुर्गंधी येत असते. म्हणजेच जिल्हा परिषद प्रशासनाकडून हागणदारीमुक्तीची कागदोपत्री घोषणा झाली असली तरी आज देखील गावे पूर्णपणे हागणदारीमुक्त झालेले नाही.
शौचालयांमध्ये भरतात भंगार
वैयक्तीक शौचालय उभारणीसाठी शासनाकडून लाभार्थ्यांना १२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत होते. अनेकांनी हे अनुदान लाटण्यासाठी नुसत्याच शौचालयांच्या चार भिंती उभारल्या. कागदोपत्री शौचालय उभारणीचे काम दाखवून शासनाकडून मिळणारे अनुदान लाटण्याचे काम केले. असे असल्यानंतर देखील अनेकजण शौचालयाचा वापर न करता उघड्यावर शौचास जात असतात. तर बांधलेल्या शौचालयांचा वापर लाकडांचे सरपण तसेच भंगार ठेवण्यासाठी करत असल्याचे दिसून येत आहे.
गुड मॉर्निंग पथक कुचकामी
उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नगरपालिका आणि ग्रामपंचायत प्रशासनाने गुड मॉर्निंग पथकाची निर्मिती करण्यात आली हाेती. या पथकातील कर्मचारी गाववेशीवर सकाळी छापा मारुन उघड्यावर शौच करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत होते. पण, कालांतराने हे पथक गायब झाले असुन सध्या कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे.