आर्वीत विविध सामाजिक संघटनांतर्फे ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम
By admin | Published: March 12, 2016 02:28 AM2016-03-12T02:28:57+5:302016-03-12T02:28:57+5:30
नो व्हेईकल डे कृती समिती आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आर्वीत ‘नो व्हेईकल डे’ पाळण्यात आला.
जनजागृती : शहरातील विविध भागातून काढण्यात आली रॅली
आर्वी : नो व्हेईकल डे कृती समिती आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आर्वीत ‘नो व्हेईकल डे’ पाळण्यात आला. लोकमतच्या पुढाकाराने आर्वीत सुरू झालेल्या या उपक्रमात जनजागृती करण्यात आली.
रॅलीची सुरुवात सकाळी ९ वाजता स्थानिक पावडे हॉस्पिटल येथून अॅड. व्ही. ए. देशपांडे, अनिल जोशी यांच्या हस्ते करण्यात आली. ही रॅली सिव्हील लाईन कोर्ट परिसर, वसंतनगर, तायडे ले-आऊट, राधाकृष्णनगर या मार्गे नेण्यात आली. रॅलीचा समारोप राधाकृष्णनगर येथे करण्यात आला.
यावेळी निरंकारी सत्संग मंडळाच्या कविता बुधवानी, सामाजिक कार्यकर्ते आरीफ, कृती समितीचे अध्यक्ष डॉ. अरुण पावडे आदींनी विचार व्यक्त करून या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. या रॅलीत गांधी विद्यालयाचे एन.सी.सी. कॅडरचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, लॉयन्स, रोटरी, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सदस्य, राधास्वामी, निरंकारी सत्संग मंडळाच्या महिला, आर्वीतील संजीवनी क्लबच्या महिला पदाधिकारी, आर्वी तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी व विविध सामाजिक संघटनांच्या सदस्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. अभय दर्भे यांनी केले. ‘नो व्हेईकल डे’ ची विशेष जनजागृती करण्यासाठी कृती समितीच्या वतीने ‘सायकल क्लब’ स्थापन करण्यात आला. यात दर रविवारी आर्वीतील डॉक्टर मंडळी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व सदस्य आर्वीतील वार्डात सकाळी नो-व्हेईकल डे पाळण्याचा संदेश सायकलद्वारे देतात. आर्वीत या उपक्रमाला प्रतिसाद वाढत आहे. शुक्रवारी रस्त्यांवर सायकलचीच वर्दळ असते.(तालुका प्रतिनिधी)
राष्ट्रीय सामाजिक विद्यालयात सभा
वर्धा : गुरुवारी राष्ट्रीय सामाजिक विद्यालय पिपरी(मेघे) येथील राष्ट्रीय हरीत सेना इको क्लब आणि वैद्यकीय जनजागृती मंच वर्धा यांच्या संयुक्त प्रयत्नातून नो व्हेईकल डे पाळण्यात आला.
सकाळी ७ वाजता आर्वी नाका चौकातून सायकल रॅली काढण्यात आली. ७० वर्ष वयाचे गौरीशंकर चंद्रात्रे यांनी रॅलीला झेंंडी दाखवून सुरुवात केली. रॅली आर्वी नाका ज्ञानेश्वर नगर, पंजाब कॉलनी, त्रिमुर्ती नगर, गिरीपेठ, कारला रोड, स्वागत कॉलनी, अंजनामाता परिसर या भागातून नेण्यात आली. नागरिकांकरिता पर्यावरण संरक्षण व पर्यावरण प्रबोधनात्मक नारे देण्यात आले. ८.३० पर्यंत फिरल्यानंतर राष्ट्रीय सामाजिक विद्यालयाच्या प्रांगणात सभा घेण्यात आली. डॉ. यशवंत हिवंज यांनी सभेचे संचालन केले. शाळेचे पर्यवेक्षक प्रशांत चौधरी यांनी गुडघेदुखीवर सर्वोत्तम उपाय म्हणजे सायकल चालविणे असल्याचे सांगितले. डॉ. सचिन पावडे यांनी निरोगी जीवन जगण्याकरिता सायकल चालविणे कसे आवश्यक आहे हे स्पष्ट केले. श्याम भेंडे यांनी सामाजिक स्वास्थ्याकरिता स्वयंचलित वाहणांचा उपयोग न करता सायकलचा उपयोग करावा असे सांगितले. डॉ. प्रशांत वाडीभस्मे यांनी नैसर्गिक साधनसंपत्तीच्या जोपासनेकरिता सायकल चालविणे आवश्यक आहे असे सांगितले. मुख्याध्यापक अशोक घारे यांनी पर्यावरण संतुलनाकरिता वर्धेतील डॉक्टर्स त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून समाज प्रबोधन करण्याकरिता वेळ देतात. त्याकरिता त्यांचे अभिनंदन केले. डॉ. सातपुते यांनी गौरीशंकर चंद्रात्रे यांचे पुष्प गुच्छ देवून स्वागत केले. व्हीजेएमचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना रोज सायकल चालविण्याचे आव्हान केले.
यशस्वीतेकरिता व्हीजेएम सदस्य विलास बरडे, वसू, महल्ले, इंगोले, डोंगरे, डॉ. जाधव, डॉ. भलमे, डॉ. ताल्हन, डॉ. मेशकर, डॉ. अमोल ठाकरे, डॉ. अभिजित खनके, मोहन मिसाळ, महेश अडसुळे, पाटनकर, दिनेश रुद्रकार आदींनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)