उसेगावच्या तंटामुक्त व वनसंरक्षण समित्या नियमबाह्य

By admin | Published: September 10, 2016 12:30 AM2016-09-10T00:30:49+5:302016-09-10T00:30:49+5:30

समुद्रपूर तालुक्यातील गट ग्रामपंचायत उसेगाव (पू) येथे तहकूब ग्रामसभेत तंटामुक्त गाव समिती व वनसंरक्षण समितीची निवड केली.

Non-violation of forests and forestry committees rules out | उसेगावच्या तंटामुक्त व वनसंरक्षण समित्या नियमबाह्य

उसेगावच्या तंटामुक्त व वनसंरक्षण समित्या नियमबाह्य

Next

जि.प.कडे ग्रामस्थांची तक्रार : तहकूब सभेत समित्यांचे गठण
वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील गट ग्रामपंचायत उसेगाव (पू) येथे तहकूब ग्रामसभेत तंटामुक्त गाव समिती व वनसंरक्षण समितीची निवड केली. वास्तविक, उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा व्हॉटस्अ‍ॅप आल्याचे सांगून या समित्यांचे नियमबाह्य गठण केल्याची तक्रारी जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांच्याकडे केली आहे. याप्रकरणी ग्रामस्थांनी संबंधितांवर कायदेशीर कार्यवाहीची मागणी केली आहे.
१५ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता ग्रामसभा बोलविण्यात आली होती. सभेच्या नियोजित वेळेच्या एक तासानंतरही कोरम पूर्ण न झाल्याने सभा तहकूब करण्यात आली. ही सभा २२ आॅगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता घेण्यात आली. सभेत नोटीसीप्रमाणे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, २०१६-१७ करीता म.ग्रा.रा.ग्रा. योजनेंतर्गत कामांची निवड करणे, विविध शासकीय योजनांची माहिती देणे, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्थी निवडणे आणि १४ व्या वित्त आयोगांतर्गत वार्षिक व पंचवार्षिक आराखडा तयार करणे, हे विषय ग्रामसभेने एकमताने पारित केले. यानंतर ग्रामसेवक प्रफूल्ल कांबळे, सरपंच अर्चना कन्नाके, उपसरपंच श्रीराम वगघने, सदस्य उद्धव दुरबूडे व सुनीता चौधरी यांनी ग्रामसेवकाच्या भ्रमणध्वनीवर जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांचा व्हॉट्सअ‍ॅप आल्याचे सांगून तंटामुक्त समिती व वनसंरक्षण समिती निवडीचा विषय ग्रामसभेत मांडला. या ठरावाला ग्रामसभेने विरोध केला. ही तहकूब सभा असल्याने आणि विषय सूचीवर हा विषय नसल्यामुळे तो घेऊ नये, अशी सूचना करण्यात आली; पण याकडे दुर्लक्ष करून सदर ठराव पारित केला. असे करण्यासाठी संमती देणारा शासनाचा आदेश दाखवा, अशी विचारणा ग्रामसभेने सचिव व सरपंचाला केली असता त्यांनी उलटसुलट उत्तर दिले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
सदर समित्या बेकायदेशीर असल्याने त्या ग्राह्य धरु नये. पूर्वीच्याच समित्या कायम ठेवाव्या. नियमांचा भंग केल्याप्रकरणी ग्रामसेवकावर फौजदारी कारवाई करून निलंबित करावे. सरपंच, उपसरपंच व त्या दोन सदस्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी ७६ जणांच्या स्वाक्षरीनिशी ग्रामस्थांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांच्याकडे तक्रारीतून केली आहे.(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Non-violation of forests and forestry committees rules out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.