बैलांचा नव्हे, भरला चक्क ट्रॅक्टरचा पोळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 11:35 PM2019-08-31T23:35:05+5:302019-08-31T23:36:00+5:30
विनोद घोडे । लोकमत न्यूज नेटवर्क चिकणी (जामणी) : वर्धा तालुक्यातील पढेगाव येथे शुक्रवारी बैल पोळा भरला. तर शनिवारी ...
विनोद घोडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : वर्धा तालुक्यातील पढेगाव येथे शुक्रवारी बैल पोळा भरला. तर शनिवारी नंदी पोळ्याच्या दिवशी जिल्ह्यात नव्हे असा पहिल्यांदाच ट्रॅक्टरचा पोळा भरविण्यात आला होता. सदर पोळा बघण्याकरिता गावातील नागरिकांसह परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
कृषी आणि श्रम संस्कृतीचे महत्त्व सांगणारा बैल पोळा सर्वत्र साजरा होत असताना येथेही तो उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच आज नंदी पोळ्याच्या दिवशी दुपारी १२ वाजता बाजार चौकात सरपंच अनंता हटवार व उपसरपंच गोपाल दुधाने यांच्यावतीने ट्रॅक्टर पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पोळ्यामध्ये जेसीबीसह २५ ते ३० ट्रॅक्टर सहभागी झाले होते. एका ट्रॅक्टरवर मखर पेटवून पोळ्याची सांगता करण्यात आली.
तत्पूर्वी छोट्या मुलाच्या हाताने पाच बक्षीसांठी ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. या मध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस ट्रॅक्टरची फोल्डर किट ट्रॅक्टर कंपनी कडून विलास कठाणे या भाग्यशाली ट्रॅक्टर मालकाला देण्यात आले. तर दुसरे भाग्यशाली प्रवीण रेवतकर हे ठरले. तृतीय क्रमांक किशोर वैद्य, चतुर्थ सारंग नासरे तर पाचवे बक्षीस विनोद सातपुते यांना देण्यात आले. जेसीबीसह इतर ट्रॅक्टर चालक-मालकांना शाल व श्रीफळ देवून सन्मानीत करण्यात आले. सजविलेल्या ट्रॅक्टरची ढोल ताशाच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली. बदलत्या काळानुसार आपल्या परंपरा ही बदलत आहेत. मात्र अलीकडे यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या घटू लागली आहे.
बैला एैवजी शेतशिवारात ट्रॅक्टर दिसून येते. हल्ली पोळ्याच्या तोरणाखाली बैलांची गर्दी खूपच कमी झाली आहे. यामुळे ट्रॅक्टरचे शेतीविषयी खूप महत्त्व वाढले आहे. शेतीकामात अविभाज्य घटक असलेल्या ट्रॅक्टरला सजवून तान्हा पोळ्याला पढेगाव येथे ट्रॅक्टरचा पोळा भरविण्यात आला. असे असले तरी परिसरातील अनेक शेतकरी आपल्या लाडक्या सर्जा-राजाच्या मदतीनेच शेती करतात. त्यांची कृतज्ञता बैलपोळ्याच्या दिवशी व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाला सरंपंच अनंता हटवार, उपसरपंच गोपाल दुधाने, तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य तसेच परिसरातील नागरिकांनी सहकार्य केले.
बक्षीस देऊन सन्मान
या पोळ्यात वैविध्यपूर्ण असलेल्या ट्रॅक्टरमालकांना मान्यवरांच्या हस्ते समारोप कार्यक्रमात बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.