स्फोटके नव्हे, चायना मेड फटाके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:03 AM2018-04-17T00:03:58+5:302018-04-17T00:04:33+5:30
येथील शिवाजी चौक परिसरात असलेल्या एका पानटपरीच्याखाली स्फोटके पडून असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून ती ताब्यात घेत पाहणी केली असता ते स्फोटके नाही तर दिवाळीत वापरण्यात येत असलेले चायनामेड अनार असल्याचे समोर आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील शिवाजी चौक परिसरात असलेल्या एका पानटपरीच्याखाली स्फोटके पडून असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून ती ताब्यात घेत पाहणी केली असता ते स्फोटके नाही तर दिवाळीत वापरण्यात येत असलेले चायनामेड अनार असल्याचे समोर आले. यामुळे पोलिसांचा जीव भांड्यात पडला. हा प्रकार सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडला.
वर्धा शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या शिवाजी चौक परिसरातील एका पानटपरीच्या खाली डिटोनेटर सारखे दिसत असलेले स्फोटके दिसून आले. यामुळे या परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली. याची माहिती पोलिसांना देण्यात आली असता ठाणेदार चंद्रकांत मदने आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी बॉम्ब विरोधी पथकही दाखल झाले. त्यांनी ही स्फोटके ताब्यात घेत त्यांची तपासणी केली असता ते केवळ दिवाळीचे चायना मेड अनार असल्याचे समोर आले. हा प्रकार स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांचाही जीव भांड्यात पडला. शिवाय शिवाजी चौक परिसरात भीतीही चायनामेडच ठरल्याची चर्चा होती.
ते स्फोटके नाहीत
शिवाजी चौक परिसरात आढळलेले ते कोणतेही स्फोटके नाही तर केवळ वापरलेले चायनामेड फटाके आहेत. त्यांना वायर वगैरे असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी ते ताब्यात घेत तपासणी केली असता ते दिवाळीचे चायनामेड फटाके असल्याचे दिसून आले.
- चंद्रकांत मदने, ठाणेदार वर्धा.