तांदळाअभावी अंमलबजावणी नाही
By admin | Published: June 1, 2015 02:15 AM2015-06-01T02:15:11+5:302015-06-01T02:15:11+5:30
दुष्काळग्रस्त भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत उन्हाळी सुटीच्या दिवसातही पोषण आहाराची खिचडी शिजविण्याचे आदेश शिक्षणमंत्र्यांनी दिले.
शासनाचे आदेश : दुष्काळग्रस्त भागातील शाळेत सुट्यांतही खिचडी शिजवा
वर्धा : दुष्काळग्रस्त भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत उन्हाळी सुटीच्या दिवसातही पोषण आहाराची खिचडी शिजविण्याचे आदेश शिक्षणमंत्र्यांनी दिले. या आदेशानुसार जिल्ह्यात काम करण्याकरिता तांदूळच नसल्याने शिक्षकांची पंचाईत होत आहे. यामुळे शिक्षणमंत्र्यांचा हा निर्णय वर्धा जिल्ह्यात अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे.
या संदर्भात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून पुणे येथील शिक्षण संचालकांच्या कार्यालयात संपर्क साधला आहे. तसा पत्रव्यवहारही झाला आहे. जिल्ह्यात पोषण आहाराच्या तांदळाचा दाणाही नसल्याने ही योजना कुचकामी ठरत असल्याचे पत्रातून कळविले आहे. यावर त्यांच्याकडून तांदूळ येण्यास आणखी आठ दिवसाचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. योजना राबविण्याचा निर्णय घेत त्याच्या सूचना आल्या, मात्र आवश्यक साधनसामग्री आली नसल्याने निर्णय कागदोपत्रीच ठरत असल्याचे समोर येत आहे.
जिल्ह्यात पाण्याने डोळे वटारल्याने दुष्काळ घोषित करण्यात आला. या बिकट परिस्थितीत ग्रामीण भागातील चिमुकल्यांना अन्नाविना राहण्याची वेळ येवू नये हा उदात्त हेतू ठेवत शिक्षणमंत्र्यांनी सुट्यांच्या दिवसातही शाळांत खिचडी शिजविण्याची योजना आखली. तसे पत्र प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. वर्धेच्या शिक्षण विभागाच्यावतीने आलेल्या पत्रानुसार प्रत्येक पंचायत समितीला आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना पत्राद्वारे दिल्या; मात्र जिल्ह्यात तांदळाचा दाणा नसल्याने पत्राची अंमलबजावणी करण्यास अनेक अडचणी जात असल्याचे जिल्ह्यात दिसत आहे.
सुट्यांच्या काळात मुलेच शाळेत येत नसल्याने खिचडी कुणाकरिता शिजवावी असाही प्रश्न अनेक शाळांतील शिक्षक करीत आहेत. काही शाळात अहवालाच्या नावावर खिचडी शिजविण्याचा प्रकार होत असल्याचे समोर येत आहे. यात घोळ होण्याची शक्यता आहे. यामुळे शासनाची ही योजना जिल्ह्यात कुचकामी ठरत असल्याचे समोर येत आहे. हीच अवस्था राज्याचीही असल्याची चर्चा शिक्षण विभागात आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेच्या ३९४ शाळांत खिचडी शिजविण्याची सक्ती
वर्धा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३९४ शाळा आहेत. शासनाच्या शाळा असल्याने त्यांच्यावर दुष्काळाच्या काळात शाळेत खिचडी शिजविण्याची सक्ती आहेच. या सक्तीनुसार शिक्षक कार्यवाही करीत असले तरी त्यांच्याकडे तांदूळ उपलब्ध नसल्याने खिचडी कशाची शिजवावी या विवंचनेत ते आहेत. केवळ तादूळच नाही तर इतर साहित्याही त्यांना मिळाले नाही. यामुळे आणखीच पंचाईत होत आहे.
जिल्हा परिषदेव्यतिरिक्त नगर परिषदेच्या ५४ शाळा आहेत. या व्यतिरिक्त खासगी शाळांचे मोठ जाळे आहे. या शाळांत मुलेच येत नसल्याने या आदेशाची अंमलबजावणी कशी करावी असा प्रश्न जिल्ह्यातील शिक्षकांना पडला आहे.
जुना तांदूळही नाही
शालेय पोषण आहरातील तांदळाचा एकही दाणा जिल्ह्यात शिल्लक नसल्याची माहिती शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. अशात नव्याने ही योजना राबविण्याच्या सूचना आल्या. त्यामुळे खिचडी शिजविण्याची नवी समस्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसमोर उभी आहे.
अनेक शाळेत कागदोपत्री खिचडी
शासनाच्या सूचना असल्याने त्याचा अहवाल सादर करावा लागणार हे स्पष्ट असल्याने बऱ्याच शिक्षकांनी त्यांच्या शाळेत खिचडी शिजविण्यात येत असल्याच्या नोंदी कागदावर घेणे सुरू केल्याची माहिती आहे. यामुळे येणाऱ्या तांदळात भ्रष्टाचार होण्याची शक्यता नाकरता येत नाही. याची चौकशी गरजेची झाली आहे.
पत्रव्यवहार होऊनही पुरवठा नाही
सुट्यांच्या दिवसात खिचडी शिजविण्याच्या आदेशानुसार शिक्षण संचालक कार्यालयाला तांदूळ देण्याबाबत पत्र पाठविण्यात आले आहे; मात्र त्यांच्याकडून अद्याप कुठलेही साहित्य आले नाही. यामुळे योजना राबविणे अडचणीचे जात असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.