शौचालय बांधण्यासाठी ३०० घरांवर नोटीस

By Admin | Published: September 4, 2016 04:46 PM2016-09-04T16:46:27+5:302016-09-04T16:46:27+5:30

शौचालय नसलेल्या कुटुंबांना शौचालय बांधण्याची सूचना देण्याचा एक वेगळाच प्रयोग जिल्ह्यातील रिसोड पंचायत समितीच्यावतीने राबविण्यात येत आहे.

Notice on 300 houses to build toilets | शौचालय बांधण्यासाठी ३०० घरांवर नोटीस

शौचालय बांधण्यासाठी ३०० घरांवर नोटीस

googlenewsNext

दादाराव गायकवाड, ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. ४ -  शौचालय नसलेल्या कुटुंबांना शौचालय बांधण्याची सूचना देण्याचा एक वेगळाच प्रयोग जिल्ह्यातील रिसोड पंचायत समितीच्यावतीने राबविण्यात येत असून, या अंतर्गत शौचालय नसलेल्या घरांवर शौचालय बांधण्याची सूचना देणारी नोटीसच लावण्यात येत आहे. या आशयाच्या नोटीस आतापर्यंत जवळपास ३०० घरांवर लावण्यात आल्या.
 
वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्यावतीने अत्यंत काटेकोरपणे स्वच्छ भारत मिशनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शासनाच्या या अभियानांतर्गत निर्धारित केलेले विविध कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीने राबवून हे अभियान तडीस नेण्याचा जणू संकल्पच जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभाग तथा स्वच्छता मिशन कक्षाने केला असून, यासाठी त्यांना जि.प.च्या पदाधिका-यांसह जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्यांचे पदाधिकारी आणि अधिकारी यांचे सहकार्य लाभत आहे. 
स्वच्छता आणि पाणी पुरवठा विभागाच्यावतीने जिल्हाभरात ‘भेटीगाठी स्वच्छतेसाठी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यात ३५ हजार कुटुंबांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासह त्यांना शौचालय बांधण्यास प्रेरित करण्यात येत आहे.
 
या अंतर्गत प्रत्येक पंचायत समिती आपापल्यापरीने वेगवेगळ्या संकल्पना अस्तित्वात आणत असताना रिसोड पंचायत समितीनेही एक वेगळीची संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. स्वच्छतेसाठी भेटीगाठी या अभियानात रिसोड तालुक्यात ४ हजार कुटुंबांच्या भेटी घेण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून, यासाठी पंचायत समितीचे पदाधिकारी हिरीरीने पुढाकार घेत आहेत. 
 
गत २२ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत तालुक्यात आतापर्यंत ६०० कुटूंबाच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधत शौचालय बांधण्याचे आवाहन करण्यात आले. त्याशिवाय पंचायत समितीने शौचालय नसलेल्या घरांवर शौचालय बांधण्याची सूचना देणारी नोटीस लावण्यास सुरुवात केली आहे. संबंधित कुटूंबप्रमुखाच नावानिशी लावण्यात येत असलेल्या य नोटीसमध्ये असे नमूद करण्यात आले आहे, की ‘‘आपण रात असलेल्या घरी शौचालय बांधकाम केले नसून, आपण व आपला संपूर्ण परिवार उघड्यावर शौचास जाता. 
 
त्यामुळे आपण आपले व गावकºयांचे आरोग्य आणि परिसरही दुषित करीत आहात. उघड्यावर शौचास बसणे हा दंडनिय अपराध असून,  आपणाविरोधात मुंबई पोलिस अधिनियम १९५१ मधील कलम ११५ व ११७ अंतर्गत सहा महिन्यांची कैद व बाराशे रुपये दंडाची कारवाई होऊ शकते.’’ 
 
या आशयाच्या नोटीस आतापर्यंत जवळपास ३०० घरांवर लावण्यात आल्या असून, त्यावर रिसोड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि गटसमन्वयकाची स्वाक्षरीही आहे. या अभिनव उपक्रमामुळे रिसोड तालुक्यातील शौचालय नसलेल्या कुटुंबांनी धास्ती घेतली आहेच; परंतु त्यांना स्वच्छतेचे महत्त्वही पटले असून, प्रत्येक कुटूंब शौचालय बांधण्यासाठी प्रेरित होत असल्याचे दिसत आहे. 

Web Title: Notice on 300 houses to build toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.