प्लास्टिक उत्पादकांना नोटीस बजावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 10:27 PM2019-07-15T22:27:13+5:302019-07-15T22:27:30+5:30
निरुपयोगी प्लास्टिक व्यवस्थापन धोरणातंर्गत जिल्ह्यात प्लास्टिकचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना निरुपयोगी प्लास्टिक संकलन करुन त्याचे पुन:निर्मिती करणे बंधनकारक आहे. मात्र, जिल्ह्यात प्लास्टिक बॉटल आणि दुध पिशव्यांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या निरुपयोगी प्लास्टिकचे संकलन करत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : निरुपयोगी प्लास्टिक व्यवस्थापन धोरणातंर्गत जिल्ह्यात प्लास्टिकचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना निरुपयोगी प्लास्टिक संकलन करुन त्याचे पुन:निर्मिती करणे बंधनकारक आहे. मात्र, जिल्ह्यात प्लास्टिक बॉटल आणि दुध पिशव्यांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या निरुपयोगी प्लास्टिकचे संकलन करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशा अशा कंपन्याना संकलन आणि पुन:निर्मिती करण्याबाबत, नोटीस देऊन जाब विचारण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिल्यात.
जिल्हा पर्यावरण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी पर्यावरणा संबंधी विविध प्रश्नाचा आढावा घेताना ते बोलत होते. याप्रसंगी जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी सचिन ओंबासे, उपवनसरंक्षक सुनील शर्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राहुल वानखेडे, पर्यावरण तज्ज्ञ चोपडा, अशासकिय सदस्य मुरलीधर बेलखोडे, डॉ. सागर हेमके आदींची उपस्थिती होती.
नगर परिषद क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी प्रक्रिया सयंत्र बसविणे याबाबत बैठकीत चर्चा झाली. नगर परिषद तसेच नगरपंचायत यांनी घनकचरा व्यवस्थापनासाठी लागणारी जागा निश्चित करुन त्यावर घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी अधिनियमांतर्गत कार्यवाही करणे आवश्यक आहे. मात्र, पुलगाव नगर परिषद क्षेत्रातील घनकचरा संकलन, व्यवस्थापन व हाताळणी व्यवस्थित होत नसल्याबाबत चोपडा यांनी प्रश्न उपस्थित केला. याबाबत नगर परिषद, हिंगणघाट व वर्धा येथील घरगुती सांडपाणी प्रक्रिया सयंत्रणेचे काम सुरू झाले असून ते लवकरात लवकर पुर्ण होण्याबाबत जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी पाठपुरावा करावा, असे जिल्हाधिकारी भिमनवार यांनी सांगितले.
हिंगणघाट नगर परिषद क्षेत्रात घरगुती सांडपाणी विना प्रक्रिया वणा नदी मध्ये मिसळत असल्यामुळे वणा नदी तिरावरील कवडघाट ते हिंगणघाट हा परिसर प्रदुषित झाला आहे. त्यामुळे प्रदुषित पट्टयाच्या कृती आराखडयामध्ये हा परिसर मोडत असून हिंगणघाट नगर परिषदे तर्फे डिसेंबर २०२० पर्यंत सांडपाणी सयंत्राची उभारणी करणे आवश्यक असल्याचे प्रादेशिक अधिकारी राहुल वानखेडे यांनी सांगितले.
याबाबत जिल्हाधिकारी यांनी हिंगणघाट आणि वर्धा शहराकरिता घरगुती सांडपाणी प्रक्रिया संयत्रण प्रकल्पाचे काम मंजूर झाले असून डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मुरलीधर बेलखोडे आणि डॉ. सागर हेमके यांनी रस्ता बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याबाबत समितीला अवगत केले. याबाबत जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता टाके यांच्याची तात्काळ दुरध्वनीवरून संपर्क साधून त्याना कडक शब्दात सुचना दिल्या.
उद्योगांना सहा महिन्यांची मुदत
देवळी एमआयडीसीमधील महालक्ष्मी टीएमटी या उद्योगामुळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होत असल्याची तक्रार राहुल चोपडा यांनी मांडली. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सदर उद्योगाची तपासणी केली असून त्यांना पुरेशी वायु प्रदुषण नियंत्रण यंत्रणा बसविण्याबाबत. कळविण्यात आले आहे. सहा महिन्यात उद्योगाने वायु प्रदूषण नियंत्रण यंत्रणा न बसविल्यास सदर उद्योगावर कार्यवाही करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.