आता वाळूसाठा असलेल्या जागा मालकावर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 05:00 AM2020-10-21T05:00:00+5:302020-10-21T05:00:21+5:30
जिल्ह्यातील वाळू घाटांचे लिलाव झाले नसले तरीही वाळू चोरट्यांनी नदी-नाल्यांसह लिलावाकरिता प्रस्तावित असलेल्या घाटातून वारेमाप उपसा चालविला आहे. नदीलगतच्या शेतकऱ्यांशी जवळीक साधून तसेच मुख्य मार्गालत असलेल्या मोकळ्या भुखंडाचा आडोसा घेत नदीपात्रातून काढलेल्या वाळूचा त्या जागेवर मोठ्या प्रमाणात साठा केल्या जातो. काही वाळू चोरट्यांनी शहरालगतच्या परिसरातील सोयीच्या जागेवर वाळू साठवून ठेवलेली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नदी-नाल्यांतून अवैधरित्या उपसा केलेल्या वाळूचा मोकळ्या जागेवर ठिय्या मारला जात आहे. कारवाईदरम्यान तो ठिय्या जप्त केल्यानंतर वाळू चोरट्यांचा थांगपत्ता लागल नाही. त्यामुळे आता वाळूचा ठिय्या ज्या जागेवर असेल त्या जागा मालकाच्या विरुद्ध पचनामा, जप्तीनामा करुन दंडात्मक कारवाई किंवा वेळप्रसंगी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी तहसीलदारांना दिले आहेत. त्यामुळे आता तिन्ही तालुक्यात वाळूच्या ठिय्यांचा शोध घेतला जात आहे.
जिल्ह्यातील वाळू घाटांचे लिलाव झाले नसले तरीही वाळू चोरट्यांनी नदी-नाल्यांसह लिलावाकरिता प्रस्तावित असलेल्या घाटातून वारेमाप उपसा चालविला आहे. नदीलगतच्या शेतकऱ्यांशी जवळीक साधून तसेच मुख्य मार्गालत असलेल्या मोकळ्या भुखंडाचा आडोसा घेत नदीपात्रातून काढलेल्या वाळूचा त्या जागेवर मोठ्या प्रमाणात साठा केल्या जातो. काही वाळू चोरट्यांनी शहरालगतच्या परिसरातील सोयीच्या जागेवर वाळू साठवून ठेवलेली आहेत. शासनाकडे महसूल न भरताही मोठ्या प्रमाणात वाळूसाठा करण्यात आल्याने तो कोणाचा आहे, याचा शोध घेण्याकरिता अधिकाऱ्यांनाही अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे वर्धा, देवळी व सेलू या तिन्ही तालुक्यात वाळू साठ्यांचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे. ज्या ठिकाणी वाळूचा साठा आढळून येईल, त्या जागा मालकाच्या पाठीमागे आता कारवाईचा ससेमिरा लागणार आहे.
त्यामुळे आता शेतकऱ्यांनी आपले शेत किंवा भूखंड मालकाने आपल्या भुखंडावर वाळू साठा असल्यास वेळीच तक्रार करण्याची गरज आहे. अन्यथा त्यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई किंवा फौजदारी कारवाई होण्याची शक्यता बळावली आहे.
सुरगावातून साळूसाठा केला जप्त
सेलू तालुक्यातील सुरगाव येथे गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु आहे. यासंदर्भात लोकमतने वारंवार वृत्तही प्रकाशित केले. सोमवारी सुरगाव व महाकाळमध्ये कारवाई कधी? या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच खुद्द उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्या नेतृत्वात महाकाळ व सुरगाव गाठले. सुरगाव नदीपात्राच्या काठावर जवळपास १५ ते १६ ब्रास वाळूसाठा आढळून आला असून तो सेलू तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आणण्यात आला आहे. या कारवाईमुळे सध्या वाळू चोरट्यांचे धाबे दणाणले आहे.
ह्यत्याह्ण वाळू चोरट्यांचा मोर्चा भदाडी नदीवर
चार दिवसांपूर्वी देवळी तालुक्यातील टाकळी (चणा) येथील नदीपात्रातून वाळू उपसा करताना महसूल विभागाने सालोड येथील अमोल कामडी व गिरोली येथील विवेक फरताडे यांची वाहने पडकून दंड ठोठावला. तसेच पोलिसांत गुन्हाही दाखल केला आहे. आता या वाळूचोरट्यांनी आपला मोर्चा सोनेगाव (बाई) व सिरसगाव (धनाढ्य) येथील भदाडी नदीपात्राकडे वळविल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. वायगाव (निपाणी) येथून जाणाऱ्या आडमार्गाने ही वाहतूक सुरु असल्याने रस्त्याची वाट लागली आहे. त्यामुळे वाळू चोरट्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
वाळू चोरीचे प्रमाण वाढल्याने आळा घालण्यासाठी वर्धा, देवळी व सेलू तहसीलदारांना कठोर कारवाईचे निर्देश दिले आहे. सोबतच तालुक्यातील वाळू साठ्यांचा शोध घेऊन ज्या जागेवर वाळूसाठा असेल त्या जागा मालकाविरुद्ध पंचनामा, जप्तीनामा करुन पुढील कारवाई करण्याच्या लेखी सूचना केल्या आहे. त्यानुसार तिन्ही तालुक्यामध्ये कारवाईचा धडका सुरु झाला आहे.
- सुरेश बगळे, उपविभागीय अधिकारी, वर्धा.