रेल्वे स्थानकाच्या अस्वच्छतेचे फोटो आता अॅपवरही घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 03:02 PM2018-08-07T15:02:57+5:302018-08-07T15:04:18+5:30
रेल्वे स्थानक, रेल्वे परिसरातील शौचालयातील अस्वच्छतेबाबत नेहमीच तक्रारी राहतात. या तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्याच्या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने अशा तक्रारी अॅपवर स्विकारण्यास सुरूवात केली आहे. २४ तास सातही दिवस ही सेवा उपलब्ध राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : रेल्वे स्थानक, रेल्वे परिसरातील शौचालयातील अस्वच्छतेबाबत नेहमीच तक्रारी राहतात. या तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्याच्या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने अशा तक्रारी अॅपवर स्विकारण्यास सुरूवात केली आहे. २४ तास सातही दिवस ही सेवा उपलब्ध राहणार आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर मंडलसह देशभरातील रेल्वेच्या सर्वच विभागात स्थानिक रेल्वे स्थानक परिसरातील व शौचालयातील अस्वच्छतेबाबतच्या तक्रारी व्हॉटस् अॅप क्रमांक ७४१००८९००४ या क्रमांकावर स्वीकारण्यात येणार आहे. रेल्वेच्या कोणत्याही प्रवाशाला स्टेशन परिसर व शौचालयात अस्वच्छता दिसल्यास त्यांनी त्वरित फोटो काढून या व्हॉटस् अॅप क्रमांकावर पाठवायचा आहे. २४ तास हा व्हॉटस् क्रमांक प्रवाशांना सेवा उपलब्ध करून देणार आहे. या क्रमांकावर तक्रार प्राप्त होताच त्याची दखल घेवून सुधारणा करण्यात येणार आहे. तसेच या संबंधित कारवाईनंतरची छायाचित्र ही प्रवाशाला पाठविली जाणार आहे. पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांनी स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारत हे अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत रेल्वे स्थानक व रेल्वे परिसरात स्वच्छ ठेवण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामुळे देशभरातील रेल्वे स्थानक, शौचालय स्वच्छ ठेवण्यास मदत होईल, असा दावा मंत्रालयाने केला आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत रेल प्रशासनाने रेल्वे स्थानक परिसर व शौचालय अस्वच्छ असल्यास तक्रारीसाठी फोटो काढून अॅपवर तो टाकण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यात ज्या प्रवाशांकडून तक्रार आली त्याला स्वच्छ झालेल्या परिसराचे फोटोही पाठविले जाणार आहे. यातून स्थानक स्वच्छ ठेवण्यास मदत होईल.
- सोमेश कुमार
मध्य रेल्वे प्रबंधक, नागपूर मंडल