आता पालिकेत ‘ई-तक्रार’ शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 11:30 PM2017-12-20T23:30:57+5:302017-12-20T23:31:09+5:30
नगर परिषद कार्यालय गाठून तक्रार करा. त्याची पोचपावती घ्या. त्यानंतर संबंधित विभाग तुमच्या तक्रारीवर कार्यवाही करेल; पण त्या समस्येचे निराकरण झाले की नाही, कुठपर्यंत काम झाले, याबाबतची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळत नव्हती.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : नगर परिषद कार्यालय गाठून तक्रार करा. त्याची पोचपावती घ्या. त्यानंतर संबंधित विभाग तुमच्या तक्रारीवर कार्यवाही करेल; पण त्या समस्येचे निराकरण झाले की नाही, कुठपर्यंत काम झाले, याबाबतची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळत नव्हती. आता स्थानिक नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना घरबसल्या ई-तक्रार नोंदविता येणार आहे. या तक्रारीवर काय कार्यवाही होत आहे, याची माहिती त्यांना घरबसल्या मिळणार आहे.
विशेषत: स्वच्छतेविषयक तक्रारींचा निपटारा करण्यात येणार आहे. केंद्रीय नगर विकास मंत्रलायाने ‘स्वच्छता अॅप’ हे मोबाईल अॅप्लिकेशन उपलब्ध केले आहे. याच अॅपद्वारे नागरिकांनी शहराला दिलेल्या प्रतिसादावरून शहराची ‘रँकींग’ ठरणार आहे. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जन्म शताब्दीनिमित्त २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत भारत स्वच्छ व हागणदारीमुक्त करण्याची शपथ घेण्यात आली. त्यादृष्टीने देशात ‘स्वच्छता मोहीम’ राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाकडून २०१६ मध्ये ७४ तर २०१७ मध्ये ४३४ शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षणाची मोहीम राबविण्यात आली. याच्या यशानंतर जानेवारी-फेब्रुवारी २०१८ मध्ये देशातील ४०४१ शहरांमध्ये ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मोहीम राबविण्यात येत आहे. यात आर्वी न. प.चा समावेश आहे. नागरिकांच्या व्यापक स्वरूपात सहभाग वाढविण्यावर भर देणे, समाजातील सर्व स्तरातील लोकांमध्ये जनजागृती करणे, शहरे स्वच्छ ठेवण्यासाठी तसेच नागरिकांना चांगल्या सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने निकोप स्पर्धेची पे्ररेणा निर्माण व्हावी, हा या सर्वेक्षणाच्या मागील मुख्य हेतू असल्याचे सांगण्यात येते.
असे करा अस्वच्छतेला हद्दपार करण्यासाठी आवेदन
स्वच्छताविषयक तक्रार नोंदविण्यासाठी केंद्र शासनाच्या नगरविकास खात्याने ‘स्वच्छता अॅप’ विकसित केले आहे. कोणत्याही स्मार्ट फोनवर ते डाऊनलोड करता येते. हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी ‘प्ले-स्टोअर’ मध्ये इंग्रजीत ‘स्वच्छता मोहुआ’ (स्वच्छता- निमिस्ट्री आॅफ अर्बन डेव्हलपमेंट) टाकून डाऊनलोड करा. त्यानंतर पसंतीची भाषा निवडा, आपला मोबाईल क्रमांक योग्य ठिकाणी नमूद करा. तुम्हाला लगेच ओटीपी (वन टाईन पासवर्ड) मिळेल. त्यानंतर ‘पोस्ट युवर फर्स्ट कम्प्लेंट’ (पहिली तक्रार पोस्ट करा)वर क्लिक करा. आता अस्वच्छतेबाबत जी तक्रार नोंदवायची आहे, त्या जागेचा फोटा काढा, ती योग्य विवरण (मृत प्राणी, कचºयाचा ढीग, कचरा गाडी आली नाही यापैकी कोणतीही)वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या परिसराचे लोकेशन व लॅन्डमार्क (स्थळ व लगतची ठळक खूण) टाईप करा हे झाल्यावर स्क्रीनवर खालील ‘पोस्ट करा’ शब्द दिसतील त्यावर क्लिक करा. याप्रकारे तुम्ही ई-प्रकार करू शकता. तक्रार नोंदविल्यानंतर ती तक्रार नगर परिषद मुख्यालयातील संबंधित कार्यालयाकडे जाईल आणि तो संबंधित क्षेत्राच्या जबाबदार कर्मचाºयाकडे तत्काळ पाठवेल. संबंधित कर्मचारी तक्रार निवारण करून त्या जागेचा तक्रार निवारणानंतरचा फोटा काढेल व पोस्ट करेल. तो संबंधित नागरिकासही तत्काळ दिसणार असल्याचे सांगण्यात आले.
जनजागृतीवर सर्वाधिक भर
मोबाईल अॅपच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रार करता येणे शक्य आहे. त्यामुळे शहरात कुठेही अस्वच्छता दिसणार नाही, यासाठी काळजी घेतली जाणार आहे. स्वच्छता ही मुख्यत: नागरिकांच्या सहभागावर अवलंबून असल्याने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर सर्वाधिक भर देण्यात येणार आहे. शिक्षकांनाही यामध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. हॉटेल व्यावसायिकांनाही स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिल्या जात आहे. स्वच्छता मोहिमेत ‘अॅप’चा जास्तीत जास्त वापर करणाºया शहरासाठी विशेष गुण राखून ठेवले आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी हे ‘अॅप डाऊनलोड’ करून आपला सहभाग नोंदवावा आणि आपल्या शहराला अधिक गुण प्राप्त करून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष, मुख्याधिकारी सर्व सभापती, सर्व नगरसेवक, सर्व नगरसेविका, सर्व अधिकारी व सर्व कर्मचारीवृंद नगरपरिषद, आर्वी यांचे कडून करण्यात येत आहे.