आता वर्धेकरांसाठी मुबलक पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 11:53 PM2018-04-13T23:53:00+5:302018-04-13T23:53:00+5:30
येथील नगर परिषद हद्दीतील रहिवाशांची तहाण भागविण्यासाठी न. प. प्रशासनाला पाटबंधारे विभागाकडून पाणी विकत घेवून त्याचा पुरवठा नागरिकांना करावा लागतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील नगर परिषद हद्दीतील रहिवाशांची तहाण भागविण्यासाठी न. प. प्रशासनाला पाटबंधारे विभागाकडून पाणी विकत घेवून त्याचा पुरवठा नागरिकांना करावा लागतो. पूर्वी वर्धेकरांसाठी ५.७९ द.ल.घ.मी. पाणी राखीब ठेवल्या जायचे; पण तेही पाणी वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने अपूरे पडत असल्याने नुकत्याच पार पडलेल्या न.प.च्या सर्वसाधारण सभेत ७.५ द.ल.घ.मी. पाणी राखीव ठेवण्याच्या विषयाला सर्व नगरसेवकांनी संमती दर्शविली आहे. त्यामुळे आता वर्धेकरांना मुबलक पाणी मिळणार आहे.
वर्धा शहरातील नागरिकांना नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा केल्या जातो. नागरिकांना पुरवठा करण्यात येणारे पाणी वर्धा न. प. प्रशासन पाटबंधारे विभागाकडून खरेदी करते. पवनार व येळाकेळे येथील धाम नदी पात्रातून या पाण्याची उचल केल्यानंतर शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण करीत तो जलसाठा ठिकठिकाणी असलेल्या जलकुंभात साठवून त्याचा पुरवठा नागरिकांना केल्या जातो. न. प. प्रशासनाने सुमारे १४ हजार कुटुंबियांना नळ जोडणी दिली आहे. त्यांच्याकडून न. प. प्रशासन पाणी पट्टी कर वसूल करते. पूर्वी पाटबंधारे विभागाकडून ५.७९ द.ल.घ.मी. पाणी राखीव ठेवून न.प. प्रशासनाकडून त्यापेक्षा जादा पाण्याची उचल करण्यात आल्याने न. प. ला पेनॉल्टी लागत होती; पण आता वाढती लोकसंख्या व वाढलेली पाण्याची मागणी लक्षात घेता ७.५ द.ल.घ.मी. पाणी राखीव ठेवण्याच्या विषयाला सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी बहूमताने संमती दर्शविली आहे. त्यामुळे आता न.प.ला पेनॉल्टी सारख्या प्रकाराला सामोरे जावे लागणार नसून नागरिकांनाही मुबलक पाणी मिळणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
१४ हजार कुटुंबीयांना नळ जोडणी
अमृत योजनेच्या माध्यमातून वर्धा शहरात नवीन जलवाहिनी टाकणे व जलकुंभ आदी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वर्धा न. प. प्रशासनाने आतापर्यंत त्यांच्या कार्यक्षेत्रातील सुमारे १४ हजार कुटुंबियांना नळ जोडणी दिली आहे. दिवसेंदिवस नळ जोडणी बाबातचे नागरिकांचे आवेदन न. प. कडे प्राप्त होत असून मागेल त्याला नळ जोडणी देण्यात येत आहे.
प्रती हजार लिटरप्रमाणे मोजावे लागते पैसे
धाम नदीच्या येळाकेळी व पवनार येथील पात्रातून उचल करण्यात येणाºया पाण्याचे प्रती हजार लिटर प्रमाणे पैसे न.प. प्रशासनाला मोजावे लागतात. न.प. प्रशासन प्रत्येक महिन्याला त्याचे देयक पाटबंधारे विभागाला अदाही करते. खरीपात २.९३ रुपये, रबी हंगामात ५.८५ रुपये तर उन्हाळी हंगामात ८.७८ रुपये प्रती हजार लिटर मागे न.प. प्रशासनाला मोजावे लागते. तर न.प. प्रशासन नळ जोडणी दिलेल्या नागरिकाकडून वर्षाला पाणी पट्टी कर म्हणून १ हजार ५०० रुपयांचे देयक देत त्याची वसूली करते. न.प. प्रशासन व पाटबंधारे विभाग यांच्या एक करार करण्यात आला आहे. हा करार सहा वर्षांसाठी करण्यात आला असून प्रत्येक वर्षी एक वेगळा करारही करण्यात येतो.
पाणी आरक्षणाचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना
उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या मागणीत वाढ होत असल्याने आरक्षीत केलेल्या पाण्यापेक्षा जादाचीच उचल न.प. प्रशासनाकडून होत होती. परिणामी, न.प. प्रशासनाला पेनॉल्टीही लागत होती. परंतु, आता पाण्याच्या आरक्षणात वाढ करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर कुठल्या शहरासाठी किती पाणी आरक्षीत ठेवावे याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असल्याचे न. प. अधिकाऱ्यांनी सांगितले.
लिकेज दुरूस्तीमुळे पाण्याच्या अपव्ययाला ब्रेक
शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी येळाकेळी ते वर्धा व पवनार ते वर्धा या मुख्य जलवाहिनींसह शहरात जलवाहिनीचे मोठे जाळेच टाकण्यात आले आहे. परंतु, जलवाहिनी वेळोवेळी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत होता. सध्या स्थितीत पवनार ते वर्धा व येळाकेळी ते वर्धा या मुख्य जलवाहिनीसह ठिकठिकाणचे जलवाहिनीचे लिकेजस दुरूस्त करण्यात आले आहे. त्यामुळे पूर्वी होत असलेल्या पाण्याच्या अपव्ययाला ब्रेक लागल्याचे न. प. पाणी पुरवठा विभागाच्यावतीने सांगण्यात आले.