पर्यावरण संवर्धनासाठी समग्र शिक्षण अंतर्गत शाळांमध्ये आता 'इको क्लब' ची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 05:35 PM2024-09-04T17:35:35+5:302024-09-04T17:36:11+5:30

Vardha : अक्षरे गिरवण्याबरोबर विद्यार्थी लावणार निसर्गालाही जीव संगोपनाची जबाबदारी खांद्यावर

Now establishment of 'Eco Club' in schools under holistic education for environment conservation | पर्यावरण संवर्धनासाठी समग्र शिक्षण अंतर्गत शाळांमध्ये आता 'इको क्लब' ची स्थापना

Now establishment of 'Eco Club' in schools under holistic education for environment conservation

लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा :
शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृती व्हावी, विद्यार्थ्यांना पर्यावरणाबाबत असलेल्या जबाबदारीची जाणीव व्हावी, म्हणून सर्व शाळांमध्ये इको क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमात शालेय विद्यार्थी अक्षरे गिरवण्याबरोबर निसर्गालाही जीव लावणार आहेत. पर्यावरणाच्या धड्याबरोबर शाळेत रोपटी लावून त्यांचे संगोपनही करणार आहेत. वृक्षारोपण केलेल्या झाडांना विद्यार्थ्यांची व वर्गाची नावे दिली जाणार आहेत.


नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नवोपक्रमशील नागरिक तयार करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये आणि क्षमता विकसित करण्यात येणार आहेत. या धोरणानुसार समग्र शिक्षण अंतर्गत शाळेतील इको क्लबची स्थापना करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी संवेदनशीलता विकसित करणे, पर्यावरणाच्या समस्या जाणून घेणे, पर्यावरण संरक्षणासाठी उपक्रमांचा समावेश करणे, विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूक असावे यासाठी प्रत्येक शाळेत इको क्लब स्थापन होणार आहे. फक्त क्लब स्थापन करून थांबायचे नाही. तर पर्यावरण विषयक जागृती, ई वेस्ट, प्लास्टिक यांचे होणारे परिणाम आणि दुष्परिणाम याचीही माहिती विद्यार्थ्यांना देणार आहे. इको क्लब अंतर्गत शाळांमध्ये पहिली ते बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण करायची आहे. त्यासाठी एका आठवड्याचे शिबिरही आयोजित करणार आहे. शिबिराच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे, शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारणे, ई- कचरा कमी करणे, कचरा कमी करणे, ऊर्जा व पाणी बचत आणि प्लास्टिकचा वापर टाळणे या सात संकल्पनांवर आधारित उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. 


त्यामुळे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ई कचरा कमी करण्यासाठी शाळांमध्ये कचरा संकलन केंद्र तयार करणे, ई कचऱ्याचा पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाविषयी माहिती दिली जाणार आहे.


मुख्याध्यापक राहणार इको क्लबचे प्रमुख 
शाळेत स्थापन केलेल्या इको क्लबचे प्रमुख मुख्याध्यापक राहणार असून प्रत्येक शाळेत दोन शिक्षक व एक वर्ग प्रभारी उपक्रम राबविण्यास मदत करणार आहेत. विद्यार्थी, शिक्षक आणि समन्वयक प्रत्येक वर्गातील मुलांचे पालक इको क्लबचे सदस्य राहणार आहेत. विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या सहभागास प्रोत्साहित करतील. इको क्लब उपक्रमांतर्गत वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात येत आहेत. 


"नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक शाळांमध्ये इको क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमामध्ये विद्यार्थी शाळांमधील शिक्षकांसह विद्यार्थीही मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. या उपक्रमामुळे पर्यावरण मित्रत्व आणि पर्यावरण संवर्धनाची संस्कृती रुजण्यास मदत होणार आहे."
- डॉ. नीतू गावंडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

Web Title: Now establishment of 'Eco Club' in schools under holistic education for environment conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :wardha-acवर्धा