प्रचारतोफांसह आता शक्ती प्रदर्शनाला येणार वेग
By admin | Published: October 11, 2014 11:12 PM2014-10-11T23:12:59+5:302014-10-11T23:12:59+5:30
विधानसभा निवडणुकीचे घोडा-मैदान आता जवळ आहे़ प्रचाराकरिता उमेदवारांकडे केवळ दोन दिवस शिल्लक राहिले असून आता शक्ती प्रदर्शनाची वेळ आली आहे़ यंदाच्या निवडणुकीत प्रचारासाठी वेळ कमी मिळाला
प्रशांत हेलोंडे - वर्धा
विधानसभा निवडणुकीचे घोडा-मैदान आता जवळ आहे़ प्रचाराकरिता उमेदवारांकडे केवळ दोन दिवस शिल्लक राहिले असून आता शक्ती प्रदर्शनाची वेळ आली आहे़ यंदाच्या निवडणुकीत प्रचारासाठी वेळ कमी मिळाला तसेच युती-आघाडी झाली नाही, यामुळे जाहीर सभांतील शेरेबाजीही फारशी आढळली नाही़ असे असले तरी सर्वच उमेदवारांनी यथाशक्ती प्रयत्न करून प्रचाराची रणधुमाळी माजविली़ आता अंतिम टप्प्यातील प्रचार सुरू असून रविवार आणि सोमवार शक्ती प्रदर्शनाने गजबजणार आहे़
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आधीच ठरवून असल्याप्रमाणे २५ वर्षांपासून असलेली शिवसेना-भाजपाची युती आणि काँगे्रस-राष्ट्रवादीची आघाडी विस्कटल्याने सर्वच पक्षांचे उमेदवार स्वतंत्रपणे लढत आहेत़ यात मतदारांची विभागणी होत असल्याचे दिसून येत आहे़ आघाडीची मते जी आजपर्यंत राष्ट्रवादी, काँगे्रसचे कार्यकर्ते संयुक्त उमेदवारासाठी मागत होते, ती आता आपल्या पक्षाला कशी मिळतील, यासाठी जोरकसपणे प्रयत्न होताना दिसून येत आहे़ यात कार्यकर्त्यांची पळवा-पळवी, पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे ओढणे, पैशाच्या बळावर प्रचारात आघाडी घेण्याचा प्रयत्न करणे यासह अन्य डावपेचही वापरले जात असल्याचे दिसून येत आहे़ हा संपूर्ण प्रकार मतदार मात्र केवळ बघ्याची भूमिका घेऊन पाहत असल्याचेच चित्र आहे़
यंदा उमेदवारांना निवडणूक प्रचाराकरिता केवळ १३ दिवसांचा कालावधी मिळाला़ या अल्प वेळेत प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली़ इतके करूनही मतदारांची भेट होत नसल्याने होते नव्हते कार्यकर्ते कामाला लावले़ शिवाय भाडोत्री कार्यकर्त्यांची व्यवस्था करूनही प्रचाराची रणधुमाळी माजविली़ आता शेवटचे दोन दिवस असल्याने प्रचाराची धुमश्चक्री माजली आहे़ सर्वच उमेदवारांनी मिळेल ते कार्यकर्ते, मिळतील त्या वाहनांनी प्रचाराचे मैदान काबीज करण्याचा आटापिटा चालविला आहे़ जिल्ह्यातील चारही मतदार संघात उमेदवार ग्रामीण भागावर अधिक भर देत असल्याचे दिसून येत आहे़ १५ आॅक्टोबरला मतदान होणार असल्याने दि़ १३ पर्यंत प्रचार करता येणार आहे़ केवळ दोनच दिवस असल्याने रविवारपासून उमेदवारांचे शक्ती प्रदर्शन सुरू होणार आहे़ यात विलग झालेल्या चारही प्रमुख पक्षांचे उमेदवार किती गर्दी खेचू शकतात, यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे़ असा ‘मॉब’ होता, या चर्चांनाही रविवारपासून उधान येणार असून याचा परिणाम बुधवारी जाणवण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ यामुळे सर्वच उमेदवार यावर भर देणार असल्याचे दिसते़