एसटीपेक्षाही कमी तिकिटात करा आता ट्रॅव्हल्सने वर्धा- नागपूर, पुणे प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 05:18 PM2024-09-30T17:18:59+5:302024-09-30T17:20:03+5:30
बुकिंगचे प्रमाण वाढले : दिवाळीत तिकीट दरवाढीबाबत अद्याप निर्णय नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : एसटी महामंडळाने महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवासात दिलेल्या सवलती बघता बहुतेक प्रवासी शासकीय बसनेच प्रवासाला प्राधान्य देतात. याचा धसका घेत ट्रॅव्हल्स कंपन्यांनी घेतला आहे. प्रवासी टिकवून ठेवण्यासाठी एसटीपेक्षा कमी दरात नागपूर, पुणे, औरंगाबाद प्रवास सुरू आहे. बुकिंगच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, दिवाळीत तिकीट दरवाढीचा अद्याप निर्णय न झाल्याने एसटीपेक्षा कमी दरात प्रवास सध्या सुरू आहे.
दिवाळी सण ट्रॅव्हल्सवाल्यांसाठी पर्वणी मानली जाते. त्यामुळे दिवाळी व भाऊबीज सणादरम्यान प्रवाशांची गर्दी वाढते. याचा फायदा घेत ट्रॅव्हल्स कंपन्या तिकिटाच्या दरात वाढ करतात, असा प्रवाशांचा अनुभव आहे. मात्र, शासनाच्या वतीने महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात सलवत देण्यात आल्याने याचा परिणाम ट्रॅव्हल्स व्यवसायावर झाला आहे. प्रवाशी मिळविण्यासाठी महिलांसाठी ट्रव्हल्स संघटनेच्या वतीने विषेश सवलत सुरू केली होती. मात्र ही अल्प काळासाठीच वर्धा- नागपूर मार्गावरील ट्रव्हल्स मध्ये होती.
भाडेवाढीसंदर्भात अद्याप निर्णय नाही
- दिवाळी सणादरम्यान प्रवाशांची संख्या बरीच वाढलेली असते. वाढलेल्या संख्येचा फायदा खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या घेतात. याच कालावधीत बऱ्याचदा महामंडळाचे कर्मचारी संप पुकारतात. त्यामुळे खासगी बसे- सशिवाय पर्याय राहात नाही.
- भाऊबिजेसाठी भाऊ व बहीण तसेच कुटुंबीय आपल्या नातेवा- इकांकडे ये-जा करतात.
- दिवाळी सणात काळी-पिवळी ट्रॅक्स चालकही प्रवासीसंख्या वाढल्याचा फायदा घेतात. अचानक भाडेदरात वाढ करतात. त्यामुळे प्रवाशांच्या आर्थिक पिळवणुकीचे प्रकार होत असतात.
शहरातून रोज जातात ट्रॅव्हल्सच्या १०० फेऱ्या
जिल्हा मुख्यालय असल्याने वर्धा येथून नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर, औरंगाबाद, पुणेसह अन्य शहराला जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स दिवसभर फेऱ्या मारतात. दिवसभरात १००पेक्षा जास्त फेऱ्या मारल्या जातात. यात वर्धा नागपूर, वर्धा- चंद्रपूर दर १५ मिनिटाला ट्रॅव्हल्स फेरी मारली जाते.
कोणत्या मार्गावर धावतात बसेस
शहरातून जवळपास जिल्हा, तालुकासह राज्यातील प्रमुख शहरांत जाण्यासाठी एसटीसह खासगी बसेसची सुविधा आहे. यात वर्धा- नागपूर, वर्धा - हिंगणघाट, वर्धा - चंद्रपूर, वर्धा- औरंगाबाद, वर्धा - पुणे यांसह अन्य शहरांसाठी खासगी कंपन्यांच्या ट्रॅव्हल्स रोज धावत आहे.
असे आहेत ट्रॅव्हल्सचे दर
ट्रॅव्हल्समधून वर्धा ते नागपूर प्रवासासाठी वातानुकूलित ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला १५० रुपये, तर साध्या ट्रॅव्हल्स प्रवासासाठी १०० रुपये भाडे मोजावे लागत आहे. तर एसटीत शिवशाहीसाठी १७० रुपये, तर जलद बससाठी ११५ रुपये मोजावे लागत आहे. तेच वर्धा- पुणे प्रवासासाठी खासगी बसमध्ये ८०० ते ९००, वर्धा ते औरंगाबाद प्रवासासाठी ७०० ते ७५०, तर वर्धा- ते लातूरसाठी ६०० ते ६५० रुपये भाडे आकारले जाते. शासकीय बसच्या तुलनेत हे भाडे कमी असल्याचे सांगण्यात आले.