आता वर्ध्यातील विद्युत वाहिनीही होणार भूमिगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 11:49 PM2019-03-02T23:49:35+5:302019-03-02T23:50:00+5:30
वीजखांब, वाहिन्यांमुळे अपघात होतात. विद्युत चोरी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे महावितरणला नेहमीच जीव आणि वित्तहानीला सामोरे लावे लागते. हे टाळण्याच्या दिशेने महावितरणचे पाऊल पुढे पडत असून आगामी काळात शहरातील विद्युत वाहिनीदेखील भूमिगत अंथरली जाणार आहे. महावितरणतर्फे तसा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
सुहास घनोकार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वीजखांब, वाहिन्यांमुळे अपघात होतात. विद्युत चोरी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे महावितरणला नेहमीच जीव आणि वित्तहानीला सामोरे लावे लागते. हे टाळण्याच्या दिशेने महावितरणचे पाऊल पुढे पडत असून आगामी काळात शहरातील विद्युत वाहिनीदेखील भूमिगत अंथरली जाणार आहे. महावितरणतर्फे तसा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
वादळवारा, पाऊस आणि विजेच्या कडकडाटामुळे महावितरण कंपनीला सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याचे वास्तव आहे. याशिवाय विद्युत चोरीचे प्रकारदेखील सुरूच असतात. विविध प्रकारच्या अपघातांमध्ये वीज वितरणचेच नुकसान होते. याशिवाय कधी-कधी निर्माण होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे शहर काळोखात बुडते. या घटनांची मागील काही वर्षांत प्रमाण वाढल्याने महावितरण कंपनीने तब्बल १८५ कोटींचा प्रस्ताव ११ फेब्रुवारीला मुख्य अभियंता, महावितरण यांच्याकडे पाठविला आहे. तेथून हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीकरिता महावितरणच्या प्रादेशिक संचालकांकडे पाठविण्यात आला आहे.
महावितरणच्या मुंबईतील मुख्यालयाने प्रस्तावातील त्रुटी दूर करीत मंजुरी दिल्यानंतर ऊर्जा मंत्रालयाकडे तो निधी उपलब्धतेसाठी पाठविला जाणार आहे. शहर ओव्हरहेड वीजवाहिनीमुक्त करण्याकरिता तब्बल १६२ किलोमीटर दुहेरी उच्चदाब तर ५७६ किलोमीटर लघुदाब विद्युत वाहिनीचे जाळे अत्याधुनिक यंत्रांच्या सहाय्याने टाकले जाणार आहे. याशिवाय सर्कल पद्धतीचे रिंग मेन युनिट कार्यान्वित करण्यात येणार असून एका ठिकाणी तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास या सर्कलमधील पर्यायी व्यवस्थेतून तो पूर्ववत सुरू करता येणार असल्याने ग्राहकांना २४ तास विद्युत पुरवठा उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे. या प्रस्तावावर ऊर्जा मंत्रालयाकडून शिक्कामोर्तब झाल्यास शहर खऱ्या अर्थाने स्मार्ट होईल, असे बोलले जात आहे.
सिव्हिल लाईनपासून काम प्रगतिपथावर
शहरातील सिव्हिल लाईनपासून भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले आहे. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी हे काम मंजूर करून घेतले. राष्टÑपिता महात्मा गांधी पुतळ्यापासून बजाज चौकापर्यंत अंदाजे अडीच ते तीन किलोमीटर उच्चदाब विद्युत वाहिनी भूमिगत टाकली जात आहे.